Mahabreaking

[breaking_news]

Buldhana district affected :बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूर आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२५ कोटींचा मदतीचा हात!

Buldhana district affected : जिल्ह्यात मार्च, जून आणि जुलै २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचे तसेच शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने १२५ कोटी ४४ लाख ५८ हजार रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३५ हजार २४० शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असून, १ लाख ३५ हजार ८५४.२३ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ही मदत वितरित करण्यात येणार आहे. ही माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

Buldhana

१ लाख ३५ हजार २४० शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा; मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

गजानन तिडके

बुलढाणा : जिल्ह्यात मार्च, जून आणि जुलै २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचे तसेच शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने १२५ कोटी ४४ लाख ५८ हजार रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३५ हजार २४० शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असून, १ लाख ३५ हजार ८५४.२३ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ही मदत वितरित करण्यात येणार आहे. ही माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

मदत व पुनर्वसन विभागाने बुलढाणा जिल्ह्यात मार्च, जून आणि जुलै २०२६ मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी २ नोव्हेंबर २०२६ रोजी तीन स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित केले आहेत. या निर्णयांनुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण १२५ कोटी ४४ लाख ५८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मार्चमधील अवकाळी पावसासाठी १.५८ कोटींची मदत

मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील १ हजार ३०६ शेतकऱ्यांच्या ९२८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १ कोटी ५८ लाख ९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जूनमधील अतिवृष्टीसाठी ८.७६ लाख रुपये

जून २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतजमिनीचे नुकसान झालेल्या २८२ शेतकऱ्यांच्या ४८.६४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ८ लाख ७६ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

जुलैमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२३ कोटींची मदत

जुलै २०२६ मध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतजमिनीचे नुकसान झालेल्या ६ हजार ४६५ शेतकऱ्यांच्या २ हजार ३८२.८७ हेक्टर क्षेत्रासाठी १० कोटी ७७ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय, जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या १ लाख २७ हजार १८७ शेतकऱ्यांच्या १ लाख ३२ हजार ४९४.७२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ११३ कोटी ३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

थेट बँक खात्यात जमा होणार मदत

शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेला निधी उपलब्ध तरतुदीतून वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांची माहिती विहित नमुन्यात संकलित करून संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्यात येईल. त्यानंतर डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीद्वारे मदतीची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

मदतीची पुनरावृत्ती टाळण्याचे निर्देश

मदत वितरण करताना यापूर्वी त्याच हंगामात वितरित करण्यात आलेल्या मदतीची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. एकाच हंगामात एकाच नुकसानीसाठी विहित दरानुसारच मदत देण्यात यावी. लाभार्थ्यांना मदत मिळविताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मदत वितरणाचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर

मंजूर निधी संबंधित नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठीच खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मदत वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मिळणारी मदत बँकांकडून कर्जवसुलीसाठी वळती केली जाणार नाही, यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. त्यामुळे मंजूर मदत पात्र बाधित शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top