Mahabreaking

[breaking_news]

  Operation Prahar : ऑपरेशन प्रहारचा बार्शीटाकळीत मोठा दणका! रेशनच्या ३५ टन तांदळासह ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Operation Prahar :  रेशनच्या धान्याच्या काळाबाजाराविरोधात पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. सिंदखेड ते बार्शीटाकळी मार्गावरील एका जिनिंगजवळ २७ ऑक्टोबर रोजी नाकाबंदीदरम्यान पकडलेल्या ट्रकमधील तब्बल ३५ टन तांदळासह सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील रेशन धान्याच्या संदर्भातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

  Operation Prahar

  ३५ टन रेशनचा तांदूळ ट्रकमधून पकडला; बार्शीटाकळीत दोघांवर गुन्हा, धान्य माफियांमध्ये खळबळ!

बबन इंगळे

बार्शीटाकळी  : रेशनच्या धान्याच्या काळाबाजाराविरोधात पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. सिंदखेड ते बार्शीटाकळी मार्गावरील एका जिनिंगजवळ २७ ऑक्टोबर रोजी नाकाबंदीदरम्यान पकडलेल्या ट्रकमधील तब्बल ३५ टन तांदळासह सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील रेशन धान्याच्या संदर्भातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंदखेड ते बार्शीटाकळी मार्गावर नाकाबंदी सुरू असताना ट्रक क्रमांक एमएच ३७ टी २३८१ पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी ट्रकची तपासणी व चालकाकडे विचारपूस केली असता त्याने दिलेली माहिती संशयास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी सदर ट्रक पोलीस ठाण्यात आणून पुढील तपासासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले.

त्यानंतर पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद गुप्ता यांनी ट्रकमधील तांदळाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले. तसेच हा तांदूळ नेमका कुठून आणला आणि कुठे पाठविण्यात येत होता, यासंदर्भातील कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेही मार्गदर्शन घेण्यात आले.

तपासादरम्यान सुरेश गांधी यांच्या ‘सुरेश ट्रेडर्स’च्या संदर्भातील काही कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यामध्ये सदर तांदूळ धान्य महामंडळाचा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, संबंधित ट्रेडर्सकडे तेलबिया व डाळींचाच परवाना असल्याची बाब समोर आल्याने या व्यवहाराबाबत संशय अधिक बळावला. त्यामुळे पुरवठा विभागाने कागदपत्रांची पडताळणी करून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली.

या प्रकरणी तहसीलदार बार्शीटाकळी यांच्या वतीने पुरवठा निरीक्षक सूरज अण्णासाहेब जगताप यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक मोहम्मद सादिक मोहम्मद हिरा खान आणि जावेद खान रफिक खान, दोघेही रा. शिकरा, पोस्ट टेकरी, जिल्हा सिदी (मध्य प्रदेश), यांच्याविरुद्ध ३० ऑक्टोबर रोजी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने कारवाई; तपासाला वेग

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार, बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आनंद कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय फराज शेख, हवालदार मंगेश महाजन, ईश्वर पातोंड आणि मनीष घुगे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आनंद कांदे करीत आहेत.

रेशनच्या धान्याची अवैध वाहतूक आणि संभाव्य काळाबाजाराच्या संशयातून झालेल्या या कारवाईमुळे धान्य माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेल्या तांदळाचा नेमका स्रोत, त्याची वाहतूक आणि संबंधित व्यवहारांची साखळी तपासातून उघड होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top