ACB: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. भ्रष्टाचाराचे निर्मूलन, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि नागरिकांचे हक्क याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

भ्रष्टाचाराविरोधात एसीबीचा पुढाकार; बाळापूर, बार्शीटाकळी, पातूरमध्ये जनजागृती
आगाखान पठाण
अकोला : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. भ्रष्टाचाराचे निर्मूलन, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि नागरिकांचे हक्क याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बाहकर, पोलीस निरीक्षक प्रवीण वेरूळकर आणि पोलीस निरीक्षक अतुल इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गोपाल किरडे, महिला पोलीस अंमलदार प्रिया सुरवाडे, पोलीस हवालदार नफीस शेख, पोलीस अंमलदार अविनाश पाचपोर आणि अमोल भांड यांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी दक्षता जनजागृती सप्ताहासंदर्भातील माहितीपत्रकांचे वितरण करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या मोहिमेंतर्गत बाळापूर, बार्शीटाकळी आणि पातूर येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पथकातील कर्मचाऱ्यांनी केले.
शासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे, लाच न देता आणि न घेता भ्रष्टाचारमुक्त कारभाराला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनीही भ्रष्टाचाराविरोधात जागरूक राहून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे, असे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला येथे दूरध्वनी क्रमांक ०७२४-२४२०३७० किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

