MLA Nitin Deshmukh : कोरड्या दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने सरसकट हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) शेलूबाजारजवळील वनोजा येथे समृद्धी महामार्ग रोखून आंदोलन केले. आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विदर्भातील चार आमदारांसह पश्चिम विदर्भातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलकांनी महामार्गावर धडक देत वाहतूक रोखल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. अखेर आमदार नितीन देशमुख यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पाच हजारांची मदत नाकारली, एक लाखांसाठी महामार्गावर संघर्ष! वनोजा येथे ठाकरे सेनेचे शक्तिप्रदर्शन
वाशिम : कोरड्या दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने सरसकट हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) शेलूबाजारजवळील वनोजा येथे समृद्धी महामार्ग रोखून आंदोलन केले. आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विदर्भातील चार आमदारांसह पश्चिम विदर्भातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलकांनी महामार्गावर धडक देत वाहतूक रोखल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. अखेर आमदार नितीन देशमुख यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या आंदोलनाच्या निमित्ताने पश्चिम विदर्भातील ठाकरे गटाच्या चार आमदारांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात भूमिका मांडली. यामध्ये बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, दर्यापूरचे आमदार गजानन मोतीराम लवटे आणि वणीचे आमदार संजय निळकंठराव देरकर यांचा समावेश होता. याशिवाय शिवसेना नेत्या जयश्री शेळके, डॉ. सिद्धार्थ देवळे, वाशिम जिल्हाप्रमुख बाळाजी वानखेडे, राजेश पाटील राऊत, अनिल पाटील राऊत, मंगरूळपीर तालुकाप्रमुख अर्जुन भीमराव सुर्वे, शिवा सावके, सचिन परळीकर, विलास लांभाडे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. पश्चिम विदर्भातील शेतकरी संघटनांचे नेते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनीही या आंदोलनाला उपस्थिती लावली.

पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ!
यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे वाशिमसह पश्चिम विदर्भातील अनेक भागांत खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, तूर यांसह विविध पिकांची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी पिके दाणे भरण्यापूर्वीच वाळून गेली. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पादन आले नाही. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आगामी रब्बी हंगामाच्या खर्चाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत ही नुकसानीच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. हजारो रुपयांचा उत्पादन खर्च करूनही हातात काहीच न उरलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांच्या मदतीने कसा दिलासा मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी केली. याशिवाय पीकविमा भरपाई आणि शेतकऱ्यांचे इतर प्रलंबित प्रश्नही आंदोलनाच्या माध्यमातून ऐरणीवर आणण्यात आले.
परवानगी नाकारली, तरी महामार्गावर धडक!
समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. संभाव्य आंदोलकांना प्रतिबंधात्मक नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महामार्ग रोखण्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम होते. शुक्रवारी सकाळपासूनच शेलूबाजार-वनोजा परिसरात पश्चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी आणि शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर धडक देत वाहतूक रोखली. यामुळे पोलीस प्रशासन आणि आंदोलक आमनेसामने आले.
आंदोलकांसह पोलिसांसाठीही जेवणाची व्यवस्था!
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पश्चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. त्यांच्या सोयीसाठी आयोजकांच्या वतीने बेसन-चपातीच्या जेवणासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने लढण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.
दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त!
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक तयारी केली होती. वनोजा परिसरासह समृद्धी महामार्गावर सुमारे दीड हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेजारील जिल्ह्यांतूनही अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली होती. एवढा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही आंदोलकांनी महामार्गावर धडक दिल्याने आंदोलनाला संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले. पोलिसांशी झालेल्या झटापटीनंतर आमदार नितीन देशमुख यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर चर्चेत आला आहे.

