Food administration : उत्पादन सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत बिरसिंगपूर, बुलढाणा येथील मे. बालाजी इंडस्ट्रीज या खाद्यतेल रिपॅकिंग आस्थापनावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. आस्थापनातील अस्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांतील विविध त्रुटी आढळल्याने संबंधित आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. तसेच, सुमारे ६,२२६ किलो खाद्यतेलाचा, एकूण ११ लाख २१ हजार ७५६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

खाद्यतेलाच्या सुरक्षिततेशी तडजोड भोवली! बालाजी इंडस्ट्रीजचा परवाना निलंबित, ६,२२६ किलो तेल जप्त
गजानन तिडके
बुलढाणा : उत्पादन सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत बिरसिंगपूर, बुलढाणा येथील मे. बालाजी इंडस्ट्रीज या खाद्यतेल रिपॅकिंग आस्थापनावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. आस्थापनातील अस्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांतील विविध त्रुटी आढळल्याने संबंधित आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. तसेच, सुमारे ६,२२६ किलो खाद्यतेलाचा, एकूण ११ लाख २१ हजार ७५६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचा साठा जप्त
तपासणीदरम्यान आस्थापनातील रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड सूर्यफूल तेलाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित तेलसाठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या साठ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- रिफाइंड सोयाबीन तेल : ३,७७१.२६ किलो, किंमत ६ लाख ६३ हजार ६३ रुपये.
- रिफाइंड सूर्यफूल तेल : २,४५५.४० किलो, किंमत ४ लाख ५८ हजार ६९३ रुपये.
या दोन्ही प्रकारच्या खाद्यतेलाची एकूण किंमत ११ लाख २१ हजार ७५६ रुपये आहे.
तपासणीत अन्नसुरक्षेतील अनेक त्रुटी उघड
अन्न प्रशासनाच्या तपासणीत आस्थापनात तांत्रिक व्यक्ती आणि FoSTaC प्रशिक्षित व्यक्ती उपलब्ध नसल्याचे आढळले. तसेच, कीटक नियंत्रण कार्यक्रम आणि अन्नसुरक्षा व्यवस्थापन आराखडा नसणे, टाक्यांच्या स्वच्छतेचे अभिलेख उपलब्ध नसणे आणि पॅकिंग साहित्याचे फूड ग्रेड प्रमाणपत्र नसणे, अशा त्रुटी निदर्शनास आल्या.
याशिवाय, कच्चे आणि तयार अन्नपदार्थ पॅलेटवर साठविण्याची सुविधाही उपलब्ध नव्हती. त्याच परिसरात भुईमुगाच्या टरफलांपासून ब्रिकेट तयार करण्याचे काम सुरू असल्याने निर्माण होणाऱ्या सूक्ष्म धुळीमुळे खाद्यतेल दूषित होण्याची संभाव्य परिस्थिती असल्याचे तपासणीत नमूद करण्यात आले.
आस्थापनाच्या चालकाने रिपॅक केलेल्या खाद्यतेलाची स्वतःच्या प्रयोगशाळेत किंवा NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करून घेतली नसल्याचेही आढळले.
विश्लेषण अहवालानंतर पुढील कारवाई
खाद्यतेलाच्या सुरक्षिततेबाबत खबरदारीचा उपाय म्हणून रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड सूर्यफूल तेलाचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित तेलसाठा जप्त ठेवण्यात येणार आहे. अहवालातील निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि अमरावती विभागाचे सह आयुक्त (अन्न) एस. डी. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली, बुलढाण्याचे सहायक आयुक्त (अन्न) प्र. शि. पाटील यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अ. सं. भोपाळे यांनी ही कारवाई केली.

