RTO: दिवाळीच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी बसचालकांनी नियमबाह्य भाडेवाढ करून जादा पैसे आकारू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिले आहेत. दिवाळीच्या काळात नियमांचे उल्लंघन करून जादा भाडे आकारल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरटीओ प्रशासनाने दिला आहे.

सणासुदीच्या काळात प्रवाशांची लूट खपवून घेणार नाही; खासगी बसचालकांना आरटीओच्या नोटिसा
आगाखान पठाण
अकोला : दिवाळीच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी बसचालकांनी नियमबाह्य भाडेवाढ करून जादा पैसे आकारू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिले आहेत. दिवाळीच्या काळात नियमांचे उल्लंघन करून जादा भाडे आकारल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरटीओ प्रशासनाने दिला आहे.
रोजगार, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने अनेक नागरिक मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सुरत यांसह विविध शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. वर्षभर कुटुंबापासून दूर राहणाऱ्या या नागरिकांना दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालविण्याची ओढ लागलेली असते. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी विविध वाहनांचा आधार घेतात.
प्रवाशांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन काही खासगी बस सेवा पुरविणाऱ्यांकडून ऐन सणासुदीच्या काळात भाडेवाढ केली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये, यासाठी अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.
दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओच्या अधिकाऱ्यांनी अकोला शहरातील खासगी बसच्या तिकीट आरक्षण कार्यालयांना भेटी देऊन संबंधितांना लेखी सूचना दिल्या. दिवाळीच्या निमित्ताने नियमबाह्य भाडेवाढ करू नये, तसेच नियमानुसार भाडेदर निश्चित करून ते दररोज कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांकडून निर्धारित दरापेक्षा जास्त भाडे आकारल्याचे आढळल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कंत्राटी वाहनांच्या भाड्याबाबत शासनाचे नियम
महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागाच्या दि. २७ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार, खासगी कंत्राटी वाहनांचे कमाल भाडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) समतुल्य बसच्या प्रतिकिलोमीटर दराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावे. त्यामुळे खासगी बस सेवा पुरविणाऱ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य
आरटीओच्या अधिकाऱ्यांनी बस सेवा पुरविणाऱ्यांना केवळ भाडेदरांबाबतच नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही सूचना दिल्या आहेत. बसमधील आपत्कालीन दरवाजा (इमर्जन्सी डोअर), अग्निशमन यंत्र आणि प्रथमोपचार पेटी सुस्थितीत ठेवावी. बसमध्ये ज्वलनशील पदार्थ ठेवू नयेत. प्रवाशांशी सौजन्याने वागावे आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जादा भाडे आकारल्यास तक्रार करा
खासगी बस सेवा पुरविणाऱ्यांकडून नियमबाह्य भाडे आकारले जात असल्यास प्रवाशांनी गप्प न बसता आरटीओ कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला यांनी केले आहे. तक्रार करताना तिकीट किंवा पावती आणि संबंधित वाहनाचा क्रमांक उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून प्रकरणाची पडताळणी करून योग्य ती कारवाई करणे शक्य होईल.
तक्रारीसाठी संपर्क :
प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला – ४४४१०४
दूरध्वनी : ०७२४-२४५९४८८
ई-मेल : mh30@mahatranscom.in
दिवाळीच्या काळात प्रवाशांची आर्थिक लूट होऊ नये आणि त्यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बस सेवा पुरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

