Cylinder explosion: गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत एका विधवा महिलेचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला. घरातील दोन लाख रुपयांची रोख रक्कम, दागिने, कपडे, भांडी, मुलांच्या शिक्षणाची कागदपत्रे आणि महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले. २० ऑक्टोबर २०२६ रोजी कासारखेड येथे घडलेल्या या दुर्घटनेत सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कासारखेडमध्ये भीषण अग्नितांडव; १० ते १२ लाखांचे नुकसान, आसरा देणारे कुटुंबही संकटात
बाळापूर : गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत एका विधवा महिलेचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला. घरातील दोन लाख रुपयांची रोख रक्कम, दागिने, कपडे, भांडी, मुलांच्या शिक्षणाची कागदपत्रे आणि महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले. २० ऑक्टोबर २०२६ रोजी कासारखेड येथे घडलेल्या या दुर्घटनेत सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यमुना भगवान इंगळे (वय ३५) या विधवा महिलेवर आधीच तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आहे. रमाई आवास योजनेंतर्गत त्यांना घर मंजूर झाले असून, स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्या नितेश भिकाजी इंगळे यांच्या घरी तात्पुरत्या स्वरूपात राहत होत्या. मानवतेच्या नात्याने नितेश इंगळे यांनी कोणताही मोबदला न घेता त्यांना आसरा दिला होता.
मात्र, अचानक गॅस गळतीमुळे घराला आग लागली आणि त्यानंतर सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. या आगीत मुलांच्या भविष्यासाठी तसेच मुलींच्या लग्नासाठी जपून ठेवलेले दागिने, घरबांधणीसाठी साठवून ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शैक्षणिक कागदपत्रेही जळून खाक झाली. आयुष्यभराच्या कष्टातून जमवलेली पुंजी क्षणात नष्ट झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आसरा देणारे हातही संकटात!
मुंबई येथे कुटुंबासह मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणारे नितेश इंगळे यांनी संकटात सापडलेल्या यमुना इंगळे यांना माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात दिला होता. मात्र, याच दुर्घटनेत त्यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे एका बाजूला मदतीची गरज असलेले कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला संकटग्रस्त महिलेला आसरा देणारे कुटुंब, अशी दोन्ही कुटुंबे अडचणीत सापडली आहेत.
घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे हे सहकाऱ्यांसह अग्निशमन दलाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनीही एकजुटीने मदतकार्य केले; मात्र तोपर्यंत घरातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते.
प्रशासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा!
आगीत झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्याची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास केला जात आहे. या भीषण दुर्घटनेमुळे संसार उघड्यावर आलेल्या यमुना इंगळे आणि त्यांच्या मुलांना, तसेच घराचे नुकसान झालेल्या नितेश इंगळे यांना तातडीने शासकीय मदत व आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
एका विधवा मातेचा संसार आणि माणुसकीच्या नात्याने दिलेला आसरा आगीत उद्ध्वस्त झाला आहे. आता प्रशासनाच्या मदतीतून या दोन्ही कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी आधार मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

