Mahabreaking

[breaking_news]

Fate intervenes :नोकरीच्या नव्या पर्वाऐवजी नियतीचा घाला; एमबीए पदवीधर वैष्णवीचा अपघातात दुर्दैवी अंत

Fate intervenes : शहरातील चिखली रोडवर पद्मबुद्धी एचपी पेट्रोल पंपासमोर रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) दुपारी स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरील दुभाजकावर असलेल्या विद्युत खांबाला जोरदार धडकून पलटी झाली. या भीषण अपघातात वैष्णवी बद्रीनाथ घुगे (वय २४, रा. भगवान बाबा कॉलनी, देऊळगाव राजा) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर कारमधील अन्य सहा जण जखमी झाले. या घटनेमुळे घुगे आणि मिसाळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Fate

चिखली रोडवर काळाचा घाला! स्विफ्ट डिझायरच्या भीषण अपघातात २४ वर्षीय वैष्णवी घुगेचा मृत्यू; सहा जण जखमी

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : शहरातील चिखली रोडवर पद्मबुद्धी एचपी पेट्रोल पंपासमोर रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) दुपारी स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरील दुभाजकावर असलेल्या विद्युत खांबाला जोरदार धडकून पलटी झाली. या भीषण अपघातात वैष्णवी बद्रीनाथ घुगे (वय २४, रा. भगवान बाबा कॉलनी, देऊळगाव राजा) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर कारमधील अन्य सहा जण जखमी झाले. या घटनेमुळे घुगे आणि मिसाळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील भगवान बाबा कॉलनीत वास्तव्यास असलेले शिक्षक बद्रीनाथ घुगे हे नवरात्रोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी मेंडगाव येथे देवीच्या आरतीसाठी कुटुंबीयांसह गेले होते. त्यांच्यासोबत मिसाळ परिवारातील सदस्यही कारमधून प्रवास करीत होते. रविवारी दुपारी देवीचे दर्शन घेऊन सर्वजण देऊळगाव राजा येथे परतत असताना शहरातील चिखली रोडवरील पद्मबुद्धी पेट्रोल पंपासमोर हा भीषण अपघात घडला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने रस्त्यावरील दुभाजकावर असलेल्या विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की कार पलटी झाली आणि वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

वैष्णवीच्या मृत्यूने कुटुंबीयांवर शोककळा

या अपघातात वैष्णवी बद्रीनाथ घुगे हिचा मृत्यू झाला. वैष्णवीने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. तिच्या शिक्षणामुळे आणि पुढील करिअरच्या आशेमुळे कुटुंबीयांना तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. नव्या आयुष्याची स्वप्ने उराशी बाळगलेल्या वैष्णवीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वैष्णवीच्या मृत्यूची नोंद देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या मेमोवरून करण्यात आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून या प्रकरणाचा प्राथमिक तपास जीपउपनिरीक्षक सुरेश मांटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सहा जण जखमी; काहींवर जालन्यात उपचार

या अपघातात वैष्णवीसह कारमध्ये प्रवास करणाऱ्या अन्य सहा जणांना दुखापत झाली. जखमींमध्ये रवी मिसाळ (वय ३८), अश्विनी रवी मिसाळ, रेवांशी रवी मिसाळ (वय ५), बद्रीनाथ घुगे (वय ५५), रंजना बद्रीनाथ घुगे (वय ५७) आणि नितांश रवी मिसाळ (वय १७) यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांपैकी काही जणांवर जालना येथे उपचार सुरू असल्याची माहिती कुटुंबीयांकडून मिळाली.

आनंदाचे क्षण दुःखात बदलले

देवीचे दर्शन घेऊन कुटुंबीयांसह घरी परतत असताना हा अपघात घडला. घरापासून काही मीटर अंतरावर असतानाच काळाने घाला घातल्याने घुगे परिवाराच्या आनंदावर विरजण पडले. वैष्णवीच्या मृत्यूच्या वृत्ताने नातेवाईक आणि परिचितांना मोठा धक्का बसला आहे. बायगाव-मेंडगाव परिसरातील घुगे परिवारासह बीड येथील मिसाळ परिवारातही शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या भीषण अपघातामुळे चिखली रोडवरील वाहनांच्या वेगाचा आणि रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top