drought: शहरासह ग्रामीण भागात अल्पवृष्टीमुळे दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत असताना नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मात्र, दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवरील गळतीतून दररोज शेकडो लिटर पाणी अक्षरशः वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकीकडे प्रशासन नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करते; मग जलवाहिन्यांमधून होणारा हा पाण्याचा अपव्यय प्रशासन कधी थांबवणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एकीकडे दहा-बारा दिवसांनी पाणी, दुसरीकडे गळतीतून पाण्याची उधळपट्टी; प्रशासनाचा ‘पाणी बचती’चा उपदेश कागदावरच?
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरासह ग्रामीण भागात अल्पवृष्टीमुळे दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत असताना नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मात्र, दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवरील गळतीतून दररोज शेकडो लिटर पाणी अक्षरशः वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकीकडे प्रशासन नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करते; मग जलवाहिन्यांमधून होणारा हा पाण्याचा अपव्यय प्रशासन कधी थांबवणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जलवाहिन्यांवरील गळती तातडीने बंद करून वाया जाणारे पाणी वाचविले, तर उपलब्ध पाण्याचा काही प्रमाणात अधिक परिणामकारक वापर करता येऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने केवळ पाणी बचतीचे आवाहन न करता स्वतःच्या यंत्रणेतील पाण्याची गळती रोखण्याची मागणी होत आहे.
खडकपूर्णा धरण मृतसाठ्यात; पाणीटंचाईचे सावट गडद
देऊळगाव राजा शहर आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे प्रमुख जलस्रोत असलेले खडकपूर्णा धरण सप्टेंबर महिन्यातच मृतसाठ्यात गेले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यानंतरच पाणीटंचाईचे संकट उभे राहिले असून, आगामी हिवाळा आणि उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एकीकडे उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘ रिअॅलिटी चेक’मध्ये गळतीचे धक्कादायक वास्तव
शहराला तसेच विविध ठिकाणांहून ग्रामीण भागाला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले.
खडकपूर्णा धरणावरून देऊळगाव राजा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर प्रमुख ठिकाणी पाच ते सहा ठिकाणी गळती आढळून आली. चिखली रोडवरील सिंगणापूर फाट्याजवळ पाणीपुरवठ्याच्या घरगुती नळजोडणीवरील दोन पंपांमधून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे दिसून आले.

गळती झालेल्या पाण्याचा कोणताही उपयोग होत नसून, संबंधित एअर व्हॉलमधून आवश्यकतेपेक्षा मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्याचे पाहणीत आढळून आले.
यानंतर जाफराबाद रोडवरून बायपासकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही मीटर अंतरावर दोन एअर व्हॉल आढळून आले. यापैकी एका ठिकाणी स्थानिक नागरिकांनी घरातील पंप लावून पाणी घेत असल्याचे दिसून आले, तर दुसऱ्या ठिकाणी जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे उडत होते. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी एकाच वेळी पाण्याची गळती होत असल्याने एकूण किती पाणी दररोज वाया जाते, याचा नेमका अंदाज लावणेही कठीण असल्याचे संबंधित पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
शहराला दहा-बारा दिवसांनी पाणी; ग्रामीण पाणीपुरवठा योजनाही अपूर्ण
देऊळगाव राजा शहर हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे बाजारपेठेचे ठिकाण असल्याने शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठ्याचे स्रोत आणि यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे.
सद्यस्थितीत शहरासह तालुक्याचा मोठा पाणीपुरवठा खडकपूर्णा धरणावर अवलंबून आहे. त्यातच धरण मृतसाठ्यात गेल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. शहराला सध्या दहा ते बारा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दुसरीकडे खडकपूर्णा धरणातून ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या जलवाहिन्यांचे काम अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही कामे अद्याप पूर्णत्वास न गेल्याने खडकपूर्णा धरणातील पाणी तालुक्यातील ग्रामीण भागाला अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
गळती थांबविल्यास उपलब्ध पाण्याचा उपयोग वाढणार
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना जलवाहिन्यांवरील गळतीकडे दुर्लक्ष करणे नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे. वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने एअर व्हॉलची तपासणी करून आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
माधुरी सिपणे, नगराध्यक्षा, देऊळगाव राजा :
“शहराला खडकपूर्णा धरणातून सध्या पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर ठिकठिकाणी एअर व्हॉल लावण्यात आले आहेत. संबंधित ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त पाण्याची गळती होत असल्यास पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला ती गळती तातडीने थांबविण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल.”
एस. एस. कुलकर्णी, प्रभारी पाणीपुरवठा अभियंता, नगरपरिषद देऊळगाव राजा :
“शहराला सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर गळती होत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आमचा विभाग तातडीने पाहणी करणार आहे. ज्या ठिकाणी एअर व्हॉलची आवश्यकता नाही किंवा एखाद्या व्हॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असेल, त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल. पाण्याची गळती थांबविण्यासाठी कार्यवाही केली जाईल.”
दिनकर जाधव, रहिवासी, देऊळगाव राजा :
“एअर व्हॉलवरील पाण्याची गळती आणि पाण्याचा अपव्यय थांबविल्यास उपलब्ध पाण्याचा काही प्रमाणात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने ही गळती थांबवून वाया जाणारे पाणी वाचवावे. तेच पाणी शहरवासीयांच्या दैनंदिन वापरासाठी कामी येऊ शकते.”
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

