Mahabreaking

[breaking_news]

  Teachers Constituency :शिक्षक मतदारसंघाच्या मतदानात ‘१’चा खेळ महत्त्वाचा; चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यास मत बाद

Teachers Constituency : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदानाची पद्धत ही सर्वसाधारण लोकसभा, विधानसभा किंवा अन्य सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. या निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवावा लागतो. त्यामुळे प्रथमच मतदान करणाऱ्या शिक्षक मतदारांसह सर्व पात्र मतदारांनी मतदानाची प्रक्रिया समजून घेऊनच मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

Teachers

 शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पसंतीक्रम नोंदविताना घ्या काळजी; आयोगाकडून मतदारांना महत्त्वाच्या सूचना

बुलढाणा : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदानाची पद्धत ही सर्वसाधारण लोकसभा, विधानसभा किंवा अन्य सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. या निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवावा लागतो. त्यामुळे प्रथमच मतदान करणाऱ्या शिक्षक मतदारांसह सर्व पात्र मतदारांनी मतदानाची प्रक्रिया समजून घेऊनच मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर आपल्या पसंतीनुसार क्रमांक नोंदविता येतो. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संख्येनुसार मतदारांना एकापेक्षा अधिक पसंतीक्रम देता येतात. मात्र, वैध मतदानासाठी पहिली पसंती दर्शविणारा ‘१’ हा अंक एका उमेदवाराच्या नावासमोर नोंदविणे अनिवार्य आहे.

मतदानासाठी केवळ जांभळ्या स्केच पेनचा वापर

मतदानाच्या वेळी निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेसोबत उपलब्ध करून दिलेल्या जांभळ्या (व्हायलेट) रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपेन किंवा लेखनाचे साधन वापरू नये. अन्य साधनाने पसंतीक्रम नोंदविल्यास मतपत्रिका अवैध ठरू शकते.

मतदाराने आपल्या प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ हा अंक लिहावा. हा अंक केवळ एका उमेदवाराच्या नावासमोरच असावा. त्यानंतर इच्छेनुसार दुसरी, तिसरी किंवा पुढील पसंती ‘२’, ‘३’ अशा क्रमाने नोंदविता येईल.

पसंतीक्रम नोंदविताना या चुका टाळा

मतदाराने कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर एकापेक्षा अधिक वेळा समान पसंतीक्रम देऊ नये. उदाहरणार्थ, ‘१’ हा अंक दोन उमेदवारांच्या नावासमोर लिहिल्यास मतपत्रिका अवैध ठरू शकते. पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच दर्शवावा. ‘एक’, ‘दोन’, ‘तीन’ अशा शब्दांमध्ये पसंतीक्रम लिहू नये.

पसंतीक्रमासाठी √ किंवा X अशी खूण करू नये. पसंतीक्रम स्पष्टपणे अंकांच्या स्वरूपातच नोंदवावा. अंक कोणत्या उमेदवारासाठी आहे, याबाबत संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीने तो लिहू नये.

मतपत्रिकेवर ओळख दर्शविणारी खूण करू नका

मतदाराने मतपत्रिकेवर स्वतःचे नाव, आद्याक्षरे किंवा अन्य कोणतेही शब्द लिहू नयेत. तसेच स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतदाराची ओळख पटेल अशी कोणतीही खूण मतपत्रिकेवर केल्यास ती मतपत्रिका अवैध ठरू शकते.

‘१’ ही पहिली पसंती अनिवार्य

मतपत्रिका वैध ठरण्यासाठी मतदाराने किमान एका उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ हा अंक लिहून पहिली पसंती दर्शविणे आवश्यक आहे. त्यानंतरचे पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहे. म्हणजेच मतदाराला दुसरी, तिसरी किंवा त्यापुढील पसंती द्यायची किंवा नाही, हा निर्णय मतदार घेऊ शकतो.

कोणत्या परिस्थितीत मतपत्रिका अवैध ठरू शकते?

‘१’ हा अंक कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर न लिहिल्यास, किंवा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर ‘१’ लिहिल्यास मतपत्रिका अवैध ठरू शकते. तसेच ‘१’ हा अंक नेमक्या कोणत्या उमेदवारासाठी आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाल्यासही मत बाद होण्याची शक्यता आहे.

एका उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ सोबत ‘२’, ‘३’ असे अन्य पसंतीक्रम एकाच वेळी लिहिणे, पसंतीक्रम शब्दांमध्ये लिहिणे, √ किंवा X अशी खूण करणे, मतदाराची ओळख पटेल असे लेखन करणे किंवा निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनव्यतिरिक्त अन्य साधनाचा वापर करणे, अशा प्रकारच्या चुका टाळणे आवश्यक आहे.

त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील मतदारांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी मतदानाची पद्धत समजून घ्यावी आणि मतपत्रिकेवर पसंतीक्रम अत्यंत काळजीपूर्वक नोंदवावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top