Mahabreaking

[breaking_news]

Illegal teak felling:  घाटबोरी वनपरिक्षेत्रात अवैध सागवानतोडीचा पर्दाफाश; मुख्य आरोपीसह साथीदारांना अटक

Illegal teak felling: घाटबोरी वनपरिक्षेत्रातील भोसा बिटाच्या कक्ष क्रमांक १८१ मध्ये अवैध सागवान वृक्षतोड केल्याप्रकरणी वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड, वृक्षतोडीसाठी वापरण्यात आलेले चेन सॉ (कटर मशिन) तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून, मुख्य आरोपीसह मदत करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Illegal

  १०३ सागवान झाडांची अवैध तोड; साग लाकूड, चेन सॉ व वाहन वनविभागाच्या ताब्यात

डोणगाव   : घाटबोरी वनपरिक्षेत्रातील भोसा बिटाच्या कक्ष क्रमांक १८१ मध्ये अवैध सागवान वृक्षतोड केल्याप्रकरणी वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड, वृक्षतोडीसाठी वापरण्यात आलेले चेन सॉ (कटर मशिन) तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून, मुख्य आरोपीसह मदत करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी भोसा बिटामध्ये सागवान वृक्षांची अवैध तोड झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता तब्बल १०३ सागवान झाडांची तोड झाल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील कलम २६ (१) एफ, डी, सी, जी तसेच कलम ४१ व ४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून ३४५ सागवान गोल नग, एकूण २०.२९१ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले.

मुख्य आरोपीला वनकोठडी

तपासादरम्यान वनविभागाने राहुल मेहेत्रे (रा. लोणी गवळी, ता. मेहकर, जि. बुलढाणा) याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर दि. ३ ऑक्टोबर रोजी त्याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, मेहकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची वनकोठडी सुनावली.

वनकोठडीदरम्यान आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, वनक्षेत्राला लागून असलेल्या ई-क्लास गटामध्येही २९ सागवान झाडांची अवैध तोड केल्याचे उघडकीस आले. या ठिकाणाहून ५० सागवान गोल नग, एकूण ५.१३४ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले.

याशिवाय सागवान झाडे कापण्यासाठी वापरण्यात आलेले चेन सॉ (कटर मशिन) तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहनही वनविभागाने जप्त केले आहे.

चौकशीत आणखी चार आरोपी निष्पन्न

मुख्य आरोपी राहुल मेहेत्रे याच्या चौकशीतून आणखी चार आरोपी निष्पन्न झाल्याचे वनविभागाने सांगितले. त्यापैकी शेख यासीम याने मुख्य आरोपीला गुन्ह्यात मदत केल्याची कबुली दिल्याचे तपासात समोर आले.

दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक, अमरावती श्रीमती ज्योती बॅनर्जी, उपवनसंरक्षक, बुलढाणा श्री. जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक, मेहकर श्री. वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटबोरी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी केली.

या प्रकरणाचा पुढील तपास घाटबोरी (प्रा.) वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. ए. बी. येवले करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top