Drought hits farm :जिल्ह्यावर सध्या दुष्काळाचे सावट गडद झाले असून, त्याची झळ केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर शेतीवर अवलंबून असलेल्या मजूर वर्गालाही बसत आहे. मेहकर तालुक्यात कशीबशी आलेली सोयाबीनची पिके तप्त उन्हामुळे वेळेआधीच वाळू लागल्याने शेतकरी सोयाबीन काढणीला लागले आहेत. मात्र, अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी असताना कापणी, मजुरी आणि थ्रेशरचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

कुठे ‘तुम्हीच कापा, तुम्हीच घ्या’, तर कुठे काढणीचा वाढता खर्च; सोयाबीनने दोघांनाही रडवले
डोणगाव : जिल्ह्यावर सध्या दुष्काळाचे सावट गडद झाले असून, त्याची झळ केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर शेतीवर अवलंबून असलेल्या मजूर वर्गालाही बसत आहे. मेहकर तालुक्यात कशीबशी आलेली सोयाबीनची पिके तप्त उन्हामुळे वेळेआधीच वाळू लागल्याने शेतकरी सोयाबीन काढणीला लागले आहेत. मात्र, अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी असताना कापणी, मजुरी आणि थ्रेशरचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
मेहकर तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख खरीप पीक असून, यंदा ६४ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा, तर ५ हजार ५७ हेक्टर क्षेत्रावर हळदीचा पेरा करण्यात आला आहे. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये जाणवणारी उन्हाची तीव्रता यंदा सप्टेंबरमध्येच जाणवू लागली. त्यात मागील सुमारे ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे.
काही भागांत सोयाबीनचे पीक करपले, तर अनेक ठिकाणी शेंगांमध्ये दाणेच भरले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादनाऐवजी खर्चाचे ओझे येऊन पडले आहे. काही ठिकाणी शेतकरी ‘तुम्हीच कापा आणि तुम्हीच घेऊन जा’ अशा पद्धतीने सोयाबीनची काढणी करून घेत आहेत, तर काही शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने स्वतःच कापणी करीत आहेत.
थ्रेशरमध्येही अडचणी
सोयाबीनचे दाणे बारीक झाल्याने ते थ्रेशरमधून काढताना कुटारासोबत बाहेर पडण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे आधीच उत्पादन घटलेले असताना मिळणाऱ्या अल्प उत्पन्नात काढणीचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
यंदा सोयाबीन काढणीसाठी एकरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये मजुरी, तर थ्रेशरमधून सोयाबीन काढण्यासाठी प्रति पोते २०० रुपये खर्च येत आहे. उत्पादनाची खात्री नसतानाही पीक शेतातून बाहेर काढण्यासाठी हा खर्च करणे शेतकऱ्यांना भाग पडत आहे.
शेतकऱ्यांसोबत मजुरांवरही संकट
सोयाबीन काढणीसाठी मजूर वर्ग सकाळीच शेतात पोहोचत आहे. मात्र, आज मिळणारी मजुरी हीच उद्याच्या रोजगाराची हमी नाही. शेतकऱ्यांकडेच उत्पादन आणि उत्पन्न कमी राहिल्यास पुढील काळात शेतीतील मजुरीची कामेही घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आज हाताला काम आहे; उद्या काय?’ हा प्रश्न मजूर वर्गासमोर उभा ठाकला आहे.
दुष्काळामुळे पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास बांधकाम क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शेती आणि बांधकाम या दोन्ही क्षेत्रांमध्ये कामाची उपलब्धता कमी झाली तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर सवाल मजुरांसमोर निर्माण झाला आहे.
एकीकडे शेतकरी सोयाबीन काढून शेती मोकळी करण्याच्या धावपळीत आहे, तर दुसरीकडे मजूर वर्ग आजच्या मजुरीसोबत उद्याच्या रोजगाराची चिंता करीत आहे. त्यामुळे यंदाच्या दुष्काळाची झळ शेताच्या बांधापासून मजुरांच्या घरापर्यंत पोहोचल्याचे चित्र मेहकर तालुक्यात दिसून येत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

