Mahabreaking

[breaking_news]

  Allegation :सरकारी जागा वैयक्तिक नावावर केल्याचा आरोप; तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

Allegation : शिंदी ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीतील शासकीय मालकीच्या जागेची नोंद कथितरीत्या एका व्यक्तीच्या वैयक्तिक नावावर केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक दिनकर सीताराम काळे यांच्याविरुद्ध अखेर साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंदखेडराजा न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून, प्रकरणातील ग्रामपंचायत अभिलेख, मालमत्ता नोंदी आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू झाली आहे.

  Allegation

 न्यायालयाच्या आदेशाने ग्रामसेवकावर गुन्हा; शिंदी ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदीची चौकशी सुरू

सिंदखेडराजा   : शिंदी ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीतील शासकीय मालकीच्या जागेची नोंद कथितरीत्या एका व्यक्तीच्या वैयक्तिक नावावर केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक दिनकर सीताराम काळे यांच्याविरुद्ध अखेर साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंदखेडराजा न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून, प्रकरणातील ग्रामपंचायत अभिलेख, मालमत्ता नोंदी आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू झाली आहे.

याप्रकरणी अशोक आत्माराम खरात यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे साखरखेर्डा पोलिसांनी दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.१९ वाजता एफआयआर क्रमांक ३१५/२०२६ नोंदविला. आरोपी तत्कालीन ग्रामसेवक दिनकर सीताराम काळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४), ३३६(३) आणि ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी जागेची वैयक्तिक नावावर नोंद केल्याचा आरोप

एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, शिंदी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना संबंधित ग्रामसेवकाने सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीतील शासकीय मालकीच्या जागेची नोंद एका व्यक्तीच्या वैयक्तिक नावावर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित नोंद ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८-अ मधील मालमत्ता नोंदीशी संबंधित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शासकीय जागेची नोंद, मालमत्ता नोंदवहीतील बदल तसेच संबंधित कागदपत्रांमध्ये कथित फेरफार व बनावट नोंदी केल्याबाबत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आक्षेप घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार; नंतर निलंबनाची कारवाई

या प्रकरणाची तक्रार पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. मात्र, सुरुवातीला अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकाला निलंबित केले होते. त्यानंतर त्यांची प्रशासकीय बदली चिखली पंचायत समितीमध्ये करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

तक्रारदार अशोक आत्माराम खरात यांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर BNSS कलम १७५(३) अन्वये सिंदखेडराजा न्यायालयाने आदेश पारित करून साखरखेर्डा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अशोक आत्माराम खरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, एफआयआरमध्ये न्यायालयाच्या आदेशाचाही संदर्भ नमूद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल निवृत्ती रंगनाथ पोफळे करीत आहेत. संबंधित ग्रामपंचायत अभिलेख, मालमत्ता नोंदवही, नोंदीतील बदल आणि इतर कागदपत्रांची तपासणी करून पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार युवराज रबडे यांनी दिली.

विभागीय चौकशीही सुरू

दरम्यान, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध विभागीय चौकशीही सुरू असल्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता पोलिस तपासात ग्रामपंचायतीच्या अभिलेखांमधून आणि मालमत्ता नोंदींच्या तपासणीत नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे शिंदी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात तक्रारदार अशोक खरात यांच्या वतीने ॲड. निशिकांत राजे जाधव, ॲड. राजेंद्र देशमुख आणि ॲड. कैलास शेळके यांनी, तर दिनकरराव काळे यांच्या वतीने ॲड. सचिन जाधव यांनी न्यायालयात बाजू मांडली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top