Mahabreaking

[breaking_news]

Lakes on the verge :तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर; बेसुमार पाणी उपशामुळे साखरखेर्डा परिसरात जलसंकटाची चाहूल

Lakes on the verge :साखरखेर्डा परिसरात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पाझर तलावांसह सिंचन तलावांची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. परिसरातील बहुतांश तलावांनी तळ गाठला असून, उरलेला पाणीसाठा गुरेढोरे व वन्यप्राण्यांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे.

Lakes

 गुंजमाथा, महालक्ष्मी, गायखेडी तलावांत मोटारपंपांचा उपसा; उरलेले पाणी गुरांसाठी राखून ठेवा!

 साखरखेर्डा   : साखरखेर्डा परिसरात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पाझर तलावांसह सिंचन तलावांची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. परिसरातील बहुतांश तलावांनी तळ गाठला असून, उरलेला पाणीसाठा गुरेढोरे व वन्यप्राण्यांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे.

साखरखेर्डा परिसरात गायखेडी, महालक्ष्मी, शिंदी, पिंपळगाव सोनारा तसेच गुंजमाथा शिवारातील दोन पाझर तलावांसह अनेक छोटे-मोठे पाझर तलाव व सिंचन तलाव आहेत. मात्र, यावर्षी पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने या सर्वच तलावांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

 पाणी उपसा सुरूच राहिल्यास संकट गंभीर

परिसरातील अनेक तलावांमधून सध्या मोठ्या प्रमाणात मोटारपंपांच्या सहाय्याने पाणी उपसा सुरू आहे. गुंजमाथा शिवारातील तलावात अनेक मोटारपंप सुरू असून, महालक्ष्मी व गायखेडी तलावातूनही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पाण्याचा हा उपसा आणखी महिनाभर सुरू राहिल्यास तलावांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठाही संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात गुरेढोरे तसेच परिसरातील वन्यप्राण्यांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.

 वन्यप्राण्यांसह गुरांसाठी पाणी महत्त्वाचे

साखरखेर्डा परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून, गुरेढोरेही मोठ्या संख्येने आहेत. उन्हाळ्यापूर्वीच तलावांमधील पाणीपातळी खालावल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलावांमध्ये सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

 कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मागणी

तलावातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी काही काळ तलाव परिसरातील कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे तलावातून होणारा अवैध अथवा बेसुमार पाणी उपसा रोखता येईल आणि उर्वरित पाणीसाठा गुरेढोरे व वन्यप्राण्यांसाठी उपलब्ध राहील, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.

सिंचन विभाग, देऊळगाव राजा यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पाहणी करावी, तलावांमधील पाणी उपशावर नियंत्रण आणावे आणि उपलब्ध पाणीसाठा राखीव ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी रास्त मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top