Mahabreaking

[breaking_news]

Dr.Milind Barhate: पुस्तकी ज्ञानासोबत सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकासही महत्त्वाचा : कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते

Dr.Milind Barhate: आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून सॉफ्ट स्किल्स आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही तितकेच महत्त्व आहे. नोकरी असो वा व्यवसाय, त्यासाठी युवा महोत्सवासारख्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार होता येते, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले.

Milind Barhate

 ‘युवा संस्पर्श-२०२६’ने बुलढाणा दुमदुमले; सहा हजारांहून अधिक विद्यार्थी महोत्सवात सहभागी

बुलढाणा : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून सॉफ्ट स्किल्स आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही तितकेच महत्त्व आहे. नोकरी असो वा व्यवसाय, त्यासाठी युवा महोत्सवासारख्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार होता येते, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन ‘युवा संस्पर्श-२०२६’ युवा महोत्सवाचे राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलढाणा येथे थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते बोलत होते.

यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशनच्या सचिव श्रीमती पद्माताई सावळे, संस्थेच्या सहसचिव अॅड. कीर्तीताई प-हाड, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. विजय नागरे, रासेयो संचालक डॉ. निलेश कडू, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत कावरे, डॉ. विजय बोरकर तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करताना कुलगुरू डॉ. बारहाते यांनी विद्यापीठाला मिळालेल्या ‘क्यूएस वर्ल्ड रँकिंग’मधील नामांकनाबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, चार दिवस चालणाऱ्या या युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुण सादर करण्यासोबतच नवीन मित्र-मैत्रिणी जोडण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. व्यासपीठावर येऊन आपली कला सादर करणे हीच यशाची पहिली पायरी आहे.

महोत्सवातील विविध स्पर्धांचे मूल्यमापन अत्यंत पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने केले जाणार असून, त्यातून निवडले जाणारे गुणवंत संघ पुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील. गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकासह विविध पारितोषिके मिळवून विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे पारदर्शक निवड प्रक्रियेचे फलित असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कला पूर्ण क्षमतेने सादर करून महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करून त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Milind Barhate

‘पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान, निरीक्षण कौशल्य महत्त्वाचे’

बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी युवा महोत्सवाच्या उद्घाटनाची घोषणा केली. ते म्हणाले की, या युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विविध सांस्कृतिक आणि कलात्मक स्पर्धांचा थरार या ठिकाणी रंगणार असून, संलग्न महाविद्यालयांमधून सहा हजारांहून अधिक विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होत आहेत.

विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञान आणि निरीक्षण कौशल्यावर भर दिला पाहिजे. या मंचाचा उपयोग करून स्वतःमधील सुप्त गुण ओळखावेत. वैयक्तिक स्पर्धांसोबतच संघटितपणे काम करण्याची भावना जपावी, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, सध्या डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात तांत्रिक प्रगतीसोबतच विविध आव्हानेही वाढली आहेत. युवा पिढीने कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून आणि नशाखोरीपासून दूर राहिले पाहिजे. प्रत्येकाने सजग राहून नशामुक्त जीवन जगण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थी आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या. अॅड. कीर्तीताई प-हाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण

युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. बेस्ट एनसीसी कॅडेट पुरस्कार मुलांमधून जी.एस. महाविद्यालय, खामगाव येथील हर्षल किरण पाटील, तर मुलींमधून विद्याभारती महाविद्यालय, अमरावती येथील कु. श्रावणी प्रमोद आपोतीकर हिला प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट कलावंत पुरस्कार डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथील श्री निखिल बाळू सखे आणि सिपना अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथील कु. निहाल लक्ष्मीकांत आसोपा यांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख पुरस्कार देऊन प्रदान करण्यात आला.

आदर्श विद्यार्थी पुरस्कार १५ हजार रुपये रोख स्वरूपात ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावती येथील वेध विवेक बारलिंगे आणि शंकरलाल खंडेलवाल कला व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथील कु. प्रणाली विनोद पिंपळकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी ‘उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्कार’ देऊन डॉ. लक्ष्मीकांत काळपांडे (प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बडनेरा), प्रा. शुभम ठाकरे (श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अमरावती), डॉ. नेत्राजी मानकर (श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला), डॉ. सागर गवई (स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेर्डा, जि. बुलढाणा), डॉ. तक्षशिला मोटघरे (महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ) आणि डॉ. रवींद्र मडावी (श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशीम) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

चार दिवसांत २८ कला प्रकारांचे सादरीकरण

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताने झाली. प्रास्ताविक डॉ. राजीव बोरकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री रणजित राजपूत यांनी, तर आभार प्रा. प्रमोद काटकर यांनी मानले.

या युवा महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येत्या चार दिवसांत तब्बल २८ विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले जाणार आहे. हजारो युवा कलावंत विविध कला सादर करून महोत्सवाचा मंच गाजवणार आहेत.

युवा महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. निखिलेश नलोडे यांच्यासह डॉ. सावन देशमुख, डॉ. नेत्रा मानकर, डॉ. प्रशांत बागडे, प्रा. सूरज हेरे, डॉ. सीमा देशमुख आणि डॉ. शर्मिला देशमुख यांनी महोत्सवाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.

तसेच श्री. अरुणभाऊ चव्हाण, डॉ. शिरीष जैन, डॉ. हर्षद केला, डॉ. विजय बोरकर, प्रा. मोहसीन खान, प्रा. पवन जगताप, प्रा. सुजित पाटील, प्रा. नरवाडे, डॉ. राणे आणि डॉ. ठाकुर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तंत्रज्ञ, विद्यार्थी आणि बुलढाणा शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top