Mahabreaking

[breaking_news]

Pardi-Agikhed road :दहा वर्षांपासून पार्डी–आगीखेड रस्ता खड्ड्यात; युवा ग्रामस्थांची खासदारांच्या दालनात धडक

Pardi-Agikhed road : पातूर तालुक्यातील पार्डी–आगीखेड रस्त्याची मागील दहा वर्षांपासून दुरवस्था झाली असून, या मार्गावरून प्रवास करताना ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार, २१ सप्टेंबर रोजी पार्डी येथील युवा ग्रामस्थांनी खासदार अनुप धोत्रे यांच्या दालनात धडक देत रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.

Pardi-Agikhed road

दोन किलोमीटरसाठी २० मिनिटांचा प्रवास; पार्डी–आगीखेड रस्त्याच्या दुरवस्थेने ग्रामस्थ त्रस्त

राहुल सोनोने

दिग्रस बु.  : पातूर तालुक्यातील पार्डी–आगीखेड रस्त्याची मागील दहा वर्षांपासून दुरवस्था झाली असून, या मार्गावरून प्रवास करताना ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार, २१ सप्टेंबर रोजी पार्डी येथील युवा ग्रामस्थांनी खासदार अनुप धोत्रे यांच्या दालनात धडक देत रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.

दोन किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी लागतात २० मिनिटे

पार्डी ते आगीखेड या मार्गाची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः गरोदर महिला किंवा गंभीर रुग्णांना उपचारासाठी पातूर येथे नेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल २० मिनिटांचा वेळ लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वन्यप्राण्यांच्या धोक्यामुळे नागरिकांमध्ये भीती

पार्डी गाव परिसर जंगलालगत असल्याने नागरिकांना पायी प्रवास करताना वन्यप्राण्यांचा धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे खराब रस्त्यामुळे चारचाकी वाहनांचा वापर करणे आवश्यक ठरत आहे. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनाने प्रवास करणेही धोकादायक बनले आहे. प्रशासनाने तातडीने या मार्गाची पाहणी करून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.

रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

रस्त्याच्या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास संपूर्ण गावाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी अनिल अत्तरकार, मोतीरामजी खुळे, सुधीर अत्तरकार, सुधाकर अत्तरकार, संजय बहाकर, सहदेव अत्तरकार, नितीन हिवराळे, संकेत बहाकर, संदीप अत्तरकार, उज्ज्वल सिरसाट, आशिष पाटील यांच्यासह अन्य युवक उपस्थित होते.

खासदारांकडून काम मार्गी लावण्याचे आश्वासन

युवा ग्रामस्थांनी खासदार अनुप धोत्रे यांची भेट घेऊन पार्डी–आगीखेड रस्त्याची समस्या मांडली. ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदारांकडून देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top