Mahabreaking

[breaking_news]

Loan waiver: बोटांचे ठसे जुळले नाहीत तरी कर्जमुक्तीचा लाभ मिळणार; शेतकऱ्यांसाठी पर्यायी आधार प्रमाणीकरण सुविधा

Loan waiver: वयामुळे किंवा अन्य कारणांमुळे बोटांचे ठसे नोंदविता न येणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणात अडथळा येऊ नये, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पर्यायी प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बोटांचे ठसे तीन वेळा घेण्याचा प्रयत्न करूनही प्रमाणीकरण न झाल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ (Unable to Authenticate) हा पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करता येणार आहे.

Loan waiver scheme

 आधार प्रमाणीकरणात अडथळा? शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

बुलढाणा  : वयामुळे किंवा अन्य कारणांमुळे बोटांचे ठसे नोंदविता न येणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणात अडथळा येऊ नये, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पर्यायी प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बोटांचे ठसे तीन वेळा घेण्याचा प्रयत्न करूनही प्रमाणीकरण न झाल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ (Unable to Authenticate) हा पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करता येणार आहे.

राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे होत असून, शासनाने यासाठी महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीमार्फत संगणकीय प्रक्रियेद्वारे ९६.९६ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी २३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

आधार प्रमाणीकरण करताना एका बोटाचा ठसा नोंदविला जात नसल्यास वेगवेगळ्या बोटांच्या ठशांद्वारे किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. त्यानंतरही प्रमाणीकरण न झाल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ हा पर्याय निवडावा. या पर्यायाची निवड केल्यानंतर संबंधित आपले सरकार सेवा केंद्र चालकाने स्वतःच्या बोटांच्या ठशांद्वारे आधार प्रमाणीकरण करावे.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तालुकास्तरीय समितीकडे (TLC) पोर्टलद्वारे पाठविण्यात येईल. संबंधित शेतकऱ्याने आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा आदी ओळख निश्चित करणारी आवश्यक कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात उपस्थित राहावे. तालुकास्तरीय समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित करण्यात येईल. आधार क्रमांक योग्य असल्याचे आढळल्यास तक्रार मान्य करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर वयस्कर अथवा बोटांचे ठसे नोंदविता न येणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमुक्तीच्या लाभाची रक्कम नियमानुसार ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top