Illicit liquor : अवैध हातभट्टी दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी बीबी पोलिसांनी धडक कारवाई करत देवानगर येथील शेतशिवारात सुरू असलेला हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत मोहसडवा रसायन, दारूच्या बाटल्या, ड्रम व इतर साहित्य असा अंदाजे ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बीबी पोलिसांची शेतात धडक कारवाई; मोहसडवा रसायनासह दारू निर्मितीचे साहित्य जप्त
रमेश खंडागळे
बीबी : अवैध हातभट्टी दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी बीबी पोलिसांनी धडक कारवाई करत देवानगर येथील शेतशिवारात सुरू असलेला हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत मोहसडवा रसायन, दारूच्या बाटल्या, ड्रम व इतर साहित्य असा अंदाजे ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बीबी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवानगर-किणगाव गट्टू परिसरात मागील काही दिवसांपासून हातभट्टी दारू निर्मिती सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणेदार गजानन सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने १६ सप्टेंबर रोजी देवानगर परिसरातील शेतात छापा टाकला.
या कारवाईदरम्यान आरोपी दत्तू झीपा राठोड यांच्या शेतातून पाच बकेटमध्ये सुमारे १०० लिटर मोहसडवा रसायन, दारूने भरलेल्या काही बाटल्या, ड्रम व दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपी दत्तू राठोड यांना ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार गजानन सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण सानप, जुबेर प्यारीवाले तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

