Ayurvedic dispensary: डोणगावजवळील शेलगाव देशमुख येथे लाखो रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेला नवीन आयुर्वेदिक दवाखाना अखेर आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र या इमारतीत अद्यापही मूलभूत सोयींचा अभाव असल्याने वैद्यकीय सेवा सुरू होण्यावर प्रश्न चिन्ह आहेत.

लाखो रुपयांचा खर्च; दवाखाना वर्षानुवर्षे धुळखात, आता आरोग्य सेवा सुरू होण्याची ग्रामस्थांना अपेक्षा
डोणगाव :डोणगावजवळील शेलगाव देशमुख येथे लाखो रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेला नवीन आयुर्वेदिक दवाखाना अखेर आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र या इमारतीत अद्यापही मूलभूत सोयींचा अभाव असल्याने वैद्यकीय सेवा सुरू होण्यावर प्रश्न चिन्ह आहेत.
दवाखान्याचे बांधकाम पूर्ण होऊनही गेल्या काही महिन्यांपासून इमारत धुळखात पडली होती. हस्तांतरण न झाल्याने काही व्यक्तींनी या इमारतीत सोयाबीनच्या पोत्यांचा साठा केला होता, अशी माहिती समोर आली होती. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या “जनता दरबारात” हा मुद्दा उपस्थित करून दवाखाना त्वरित सुरू करण्याची मागणी केली.
यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी डोणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड यांना सदर इमारतीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. डॉ. गायकवाड यांनी पाहणी केली असता इमारतीपर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही, तसेच वीज आणि पाणीपुरवठा देखील नाही, असे आढळून आले. त्यामुळे सद्यस्थितीत या ठिकाणी वैद्यकीय सेवा देणे शक्य नसल्याचा अहवाल त्यांनी सादर केला.
यानंतर ग्रामपंचायतीमार्फत इमारतीतील सोयाबीनचा साठा काढून टाकण्यात आला आणि त्रुटींसह दवाखाना आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र अद्याप रस्ता, पाणी व वीजपुरवठा सुरू न झाल्याने दवाखाना कार्यान्वित झालेला नाही. ग्रामस्थ आणि शैलेश सावजी यांनी या त्रुटी दूर करून लवकरात लवकर वैद्यकीय सेवा सुरू व्हावी, अशी मागणी केली आहे.

