students honestly : शहरातील आयसीआय क्लासेसच्या दोन विद्यार्थ्यांनी रस्त्यावर सापडलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोने परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर ठेवला. करण शिंदे आणि जयेश घुगे या विद्यार्थ्यांना ७ सप्टेंबर रोजी सिव्हिल कॉलनी परिसरात सोने सापडले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता हे सोने आयसीआय क्लासेसचे संचालक विनायक फुके यांच्याकडे सुपूर्द केले.

शिक्षणासोबत संस्कारांचीही शिदोरी; विद्यार्थ्यांनी परत केले लाखाचे सोने
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील आयसीआय क्लासेसच्या दोन विद्यार्थ्यांनी रस्त्यावर सापडलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोने परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर ठेवला. करण शिंदे आणि जयेश घुगे या विद्यार्थ्यांना ७ सप्टेंबर रोजी सिव्हिल कॉलनी परिसरात सोने सापडले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता हे सोने आयसीआय क्लासेसचे संचालक विनायक फुके यांच्याकडे सुपूर्द केले.
विनायक फुके यांनी परिसरात चौकशी केली असता, सिव्हिल कॉलनी परिसरात मेसचा व्यवसाय करणाऱ्या जया कुडे व चेतना सवडतकर या दोन्ही बहिणींची माहिती समोर आली. चौकशीत जया कुडे यांचेच सोने हरविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विनायक फुके यांनी संबंधित महिलेला बोलावून योग्य खात्री केली आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हरविलेले सोने जया कुडे यांच्याकडे परत केले.
सोन्याची किंमत मोठी असतानाही विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत जया कुडे व चेतना सवडतकर यांनी आयसीआय क्लासेसचे संचालक विनायक फुके तसेच करण शिंदे व जयेश घुगे यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी दोघांना पाच हजार रुपये रोख बक्षीस दिले. तसेच दोन्ही विद्यार्थ्यांना दोन महिन्यांसाठी मेसची सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला.
दोन वर्षांच्या कष्टाच्या कमाईतून घेतले होते सोने
जया कुडे व चेतना सवडतकर या दोन्ही बहिणी सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यांनी सुमारे दोन वर्षांच्या कष्टाच्या कमाईतून हे सोने खरेदी केले होते. त्यामुळे हरविलेले सोने परत मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे परिसरातूनही त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी प्रतिक्रिया देताना आयसीआय क्लासेसचे संचालक विनायक फुके म्हणाले, “सोन्याची किंमत एक लाख रुपये असली, तरी विद्यार्थ्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मौल्यवान आहे. विद्यार्थ्यांनी दाखवून दिले की, शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळवणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद आणि चांगले संस्कार आत्मसात करणे होय.”
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय प्रामाणिकपणाबद्दल आयसीआय क्लासेसच्या वतीने करण शिंदे आणि जयेश घुगे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या कृतीचे पालक, शिक्षक तसेच परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

