Mahabreaking

[breaking_news]

  Soybean crop : शेंगा लागण्यापूर्वीच सोयाबीन करपले; पातूर तालुक्यात शेतकरी संकटात

Soybean crop : पातूर तालुक्यातील अनेक भागांत मागील ३५ ते ४० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सोयाबीन व तूर पिके शेंगा लागण्यापूर्वीच करपून वाळू लागल्याचे चित्र अनेक शेतांमध्ये दिसून येत आहे. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे पातूर तालुका कोरड्या दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी युवा शेतकऱ्यांनी तहसीलदार राहुल वानखडे यांच्याकडे दि. ७ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली.

  Soybean crop

  ४० दिवसांपासून पावसाचा खंड; सोयाबीन ९० टक्के वाळले, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

राहुल सोनोने

दिग्रस बू. : पातूर तालुक्यातील अनेक भागांत मागील ३५ ते ४० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सोयाबीन व तूर पिके शेंगा लागण्यापूर्वीच करपून वाळू लागल्याचे चित्र अनेक शेतांमध्ये दिसून येत आहे. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे पातूर तालुका कोरड्या दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी युवा शेतकऱ्यांनी तहसीलदार राहुल वानखडे यांच्याकडे दि. ७ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली.

पार्डी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी दुबार पेरणी केली होती. मात्र, त्यानंतरही पावसाने पाठ फिरवल्याने पिके वाळण्यास सुरुवात झाली आहे. शेतातील उभी पिके करपलेली पाहून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, झालेल्या नुकसानीमुळे आगामी काळात आर्थिक परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पार्डी परिसरात गेल्या ४० दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने सोयाबीनचे सुमारे ९० टक्के पीक वाळून गेल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष शेतपाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत आणि शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व तूर पिकांचा पीकविमा काढला आहे, त्यांच्या नुकसानीची विमा कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार पीकविमा नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

‘शेतात जाण्याचीही हिंमत होत नाही’

पावसाअभावी शेतातील पिकांची झालेली अवस्था पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोठा खर्च करून पेरणी, बियाणे, खते, औषधे व मशागतीचा खर्च केल्यानंतरही पिके हातातून जात असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

‘विमा किंवा शासनाकडून तातडीची मदत मिळावी’

“माझ्या शेतातील सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले असून पीक करपून गेले आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन पीकविम्याची नुकसानभरपाई मिळवून द्यावी किंवा शासनाकडून सरसकट मदत जाहीर करावी. त्यामुळे या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळेल,” अशी प्रतिक्रिया प्रगतिशील युवा शेतकरी आशिष पाटील (पार्डी, बाभूळगाव) यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती संबंधित यंत्रणेला तातडीने द्यावी. महिनाभरापासून पावसाचा खंड असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी विमा कंपनीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे.

या मागणीसाठी आशिष पाटील, निलेश हिवराळे, उज्वल शिरसाट, सुधीर अत्तरकार, गोपाल बहकार, विजय बहाकार, रामकृष्ण शिंदे, संजय बहाकर, सहदेव अत्तरकार, धनंजय बहाकार, सचिन हिवराळे, प्रेमानंद इंगळे, हर्षल शिरसाट, शुभम हिवराळे, तुषार देवकर, अमर हिवराळे, संदीप हिवराळे, भीमराव हिवराळे, राजेश सोनोने आदी युवक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top