Accused escapes: जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथून वैद्यकीय तपासणीदरम्यान पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या सहा तासांत जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात कारवाई केली. फरार आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रुग्णालयातून पळालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या; मदत करणाऱ्या भावालाही LCBने पकडले
बुलढाणा : जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथून वैद्यकीय तपासणीदरम्यान पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या सहा तासांत जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात कारवाई केली. फरार आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन एमआयडीसी मलकापूर येथील अपराध क्रमांक १०९/२०२६, कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहितेअंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी प्रतापसिंग सुरजसिंग बावरी (वय २०, रा. म्हाडा कॉलनी, मलकापूर) आणि कपूरसिंग सुरजसिंग बावरी (वय २५, रा. म्हाडा कॉलनी, मलकापूर) यांना दि. ७ सप्टेंबर रोजी वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे आणण्यात आले होते.
दरम्यान, पहाटे सुमारे ३ वाजता आरोपी प्रतापसिंग बावरी याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या खिडकीतून उडी मारून पलायन केले. आरोपी फरार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देत स्वतः शोधकार्यात सहभाग घेतला आणि विविध पथकांना मार्गदर्शन केले.
तांत्रिक विश्लेषणातून माग काढला
फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती तसेच तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू केला. या तपासात आरोपी बुलढाण्याहून मलकापूरमार्गे भुसावळ शहराच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मलकापूरमार्गे जळगाव जिल्ह्यातील दिपनगर, भुसावळ येथे पोहोचले. तेथे पोलिसांनी मोठ्या शिताफीने फरार आरोपी प्रतापसिंग बावरी याला ताब्यात घेतले. तसेच त्याला पळून जाण्यास मदत करणारा त्याचा भाऊ तुफानसिंग सुरजसिंग बावरी (वय १९, रा. म्हाडा कॉलनी, मलकापूर) यालाही पोलिसांनी पकडले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन मोबाईल फोन तसेच एक बजाज पल्सर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन एमआयडीसी मलकापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णालयातून फरार झालेल्या आरोपीविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८४९/२०२६, कलम २६२ भारतीय न्याय संहितेनुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व अपर पोलीस अधीक्षक खामगाव पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, शेख चाँद, विजय पैठणे, गणेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले, निलेश राजपूत तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू आडवे व पोलीस कॉन्स्टेबल कैलास ठोंबरे यांचा सहभाग होता.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

