fitness certification : वाहनांच्या फिटनेस तपासणीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्वयं-संचालित वाहन चाचणी केंद्रामुळे (एटीएस) जुन्या वाहनधारकांची धाकधूक वाढली आहे. या केंद्रात वाहनांची अत्याधुनिक आणि संगणकीय पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याने वाहनामध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास त्याचे पासिंग नामंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वार्षिक पासिंगसाठी येणाऱ्या वाहनधारकांचे या केंद्राकडे विशेष लक्ष लागले आहे.

अकोला आरटीओचे अत्याधुनिक चाचणी केंद्र सुरू; एसटीच्या १०-१२ वर्षे जुन्या बसांसमोर फिटनेसचे आव्हान
आगाखान पठाण
अकोला : वाहनांच्या फिटनेस तपासणीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्वयं-संचालित वाहन चाचणी केंद्रामुळे (एटीएस) जुन्या वाहनधारकांची धाकधूक वाढली आहे. या केंद्रात वाहनांची अत्याधुनिक आणि संगणकीय पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याने वाहनामध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास त्याचे पासिंग नामंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वार्षिक पासिंगसाठी येणाऱ्या वाहनधारकांचे या केंद्राकडे विशेष लक्ष लागले आहे.
अकोला आरटीओ कार्यालयातील हे स्वयं-संचालित चाचणी केंद्र दि. १ सप्टेंबरपाूसन कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र, दि. ४ सप्टेंबरपर्यंत या केंद्रात केवळ चार वाहनांची तपासणी झाल्याची माहिती आहे. अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेल्या या केंद्रात वाहनाची तपासणी मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून संगणकीय पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे वाहनाची प्रत्यक्ष स्थिती आणि त्यातील तांत्रिक त्रुटी अचूकपणे समोर येण्याची शक्यता आहे.
सीसीटीव्हीच्या निगराणीखाली तपासणी
स्वयं-संचालित चाचणी केंद्राचे कामकाज एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले असून, केंद्र उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. केंद्रात वाहन तपासणीची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय पद्धतीने पार पडणार आहे. तपासणीच्या ठिकाणी संबंधित कर्मचारी व अधिकृत व्यक्तींव्यतिरिक्त इतरांना प्रवेश दिला जाणार नाही. वाहनांची तपासणी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली केली जाणार असल्याने प्रक्रियेत पारदर्शकता राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वाहनाच्या तपासणीसाठी वाहनाच्या प्रकारानुसार सुमारे ६०० रुपयांपासून ६ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. तसेच १५ वर्षे पूर्ण झालेल्या वाहनाच्या पासिंगला विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाते.
जुन्या वाहनधारकांची धाकधूक
अत्याधुनिक यंत्रणेद्वारे वाहनाची प्रत्येक बाब तपासली जाणार असल्याने जुनी वाहने असलेल्या वाहनमालकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः टायर, चाके, स्टेअरिंग यंत्रणा तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक बाबींमध्ये त्रुटी असल्यास त्या तपासणीत समोर येणार आहेत. त्यामुळे वाहन पासिंगपूर्वी त्याची संपूर्ण दुरुस्ती करून घेण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे.
लालपरीसमोर फिटनेसचे आव्हान
दरम्यान, अकोला आरटीओच्या स्वयं-संचालित चाचणी केंद्रात आता एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’चीही अग्निपरीक्षा होणार आहे. महामंडळाच्या अनेक बस १० ते १२ वर्षे जुन्या आहेत. दीर्घकाळ सेवेत असलेल्या या बसांच्या टायर, चाके, स्टेअरिंगसह अन्य यांत्रिक भागांमध्ये तांत्रिक त्रुटी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संगणकीय आणि अत्याधुनिक पद्धतीने होणाऱ्या फिटनेस तपासणीत एसटीच्या जुन्या बस कितपत पात्र ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एसटी महामंडळाच्या जुन्या बसांच्या फिटनेस तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्यास त्यांचे पासिंग कसे होणार, तसेच एसटी प्रशासन त्यासाठी कोणती भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एसटीच्या बसांनाही इतर वाहनांप्रमाणेच या अत्याधुनिक चाचणी प्रक्रियेतून जावे लागणार असल्याने महामंडळासमोर वाहनांची देखभाल आणि फिटनेस कायम ठेवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
वाहनधारकांमध्ये नाराजी
वाहनांच्या फिटनेस तपासणीची जबाबदारी खासगी कंपनीकडे सोपविण्याच्या शासनाच्या निर्णयाबाबत काही वाहनचालक व वाहनमालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संगणकीय तपासणीमुळे वाहनांच्या फिटनेसबाबत पारदर्शकता वाढेल, असे प्रशासनाचे म्हणणे असले तरी जुन्या वाहनधारकांना मात्र पासिंग प्रक्रियेबाबत धास्ती वाटत आहे.नव्या एटीएसमध्ये तपासणीची प्रक्रिया प्रत्यक्षात कशी पार पडते, किती वाहने फिटनेस चाचणीत पात्र ठरतात आणि एसटी महामंडळाच्या जुन्या बसांच्या पासिंगबाबत काय निर्णय होतो, याकडे अकोला जिल्ह्यातील वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

