voter list : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार असून, भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी रविवारी, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासता येणार असून, नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे अथवा हरकती नोंदविण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

निवडणुकीपूर्वी मतदार यादीची ‘कसोटी’; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकतींची संधी
बुलढाणा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार असून, भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी रविवारी, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासता येणार असून, नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे अथवा हरकती नोंदविण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मतदार यादीतील प्रत्येक नाव निवडणुकीच्या राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि संभाव्य उमेदवारांचे लक्ष मतदारसंघनिहाय मतदारसंख्येतील बदल, नवीन मतदार तसेच मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेकडे लागले आहे.
भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा जाहीर केला असून, त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचाही समावेश आहे. या प्रक्रियेत पात्र मतदारांची नोंद अचूक ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.
जिल्ह्यात १८ लाख ९९ हजारांहून अधिक मतदार
दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १८ लाख ९९ हजार ०२८ मतदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये ९ लाख ९१ हजार ४१३ पुरुष, ९ लाख ०७ हजार ५८८ महिला आणि २७ इतर मतदारांचा समावेश आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्या
• २१-मलकापूर : २ लाख ५८ हजार ४०७
• २२-बुलढाणा : २ लाख ४९ हजार ०६४
• २३-चिखली : २ लाख ६७ हजार ३२६
• २४-सिंदखेडराजा : २ लाख ९१ हजार २४६
• २५-मेहकर : २ लाख ८२ हजार ४७१
• २६-खामगाव : २ लाख ७५ हजार ५३५
• २७-जळगाव जामोद : २ लाख ७४ हजार ९७९
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार असून, बुलढाणा मतदारसंघात तुलनेने कमी मतदारसंख्या असल्याचे प्रारूप यादीवरून स्पष्ट होत आहे.
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण; २३०१ केंद्रे प्रस्तावित
मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणानंतर जिल्ह्यात एकूण २३०१ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या प्रक्रियेत नवीन मतदान केंद्रांची निर्मिती, केंद्रांचे विभाजन व विलीनीकरण तसेच काही मतदान केंद्रांच्या नावात आणि ठिकाणात बदल करण्यात आले आहेत.
मलकापूर मतदारसंघात ७, बुलढाण्यात १, सिंदखेडराजात २, खामगावमध्ये २ आणि जळगाव जामोद मतदारसंघात २ अशी एकूण १४ नवीन मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांतील हे बदल आगामी निवडणुकांतील व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.
३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती
प्रारूप मतदार यादीमध्ये नाव नसल्यास, नाव किंवा पत्त्यात त्रुटी असल्यास अथवा अन्य आक्षेप असल्यास संबंधित मतदारांना विहित नमुन्यात दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. संबंधित मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
सुधारित वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असा आहे. दावे व हरकतींवरील निर्णयाची प्रक्रिया २२ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राजकीय पक्षांसाठीही महत्त्वाचा टप्पा
मतदार यादीतील अचूकता ही लोकशाही प्रक्रियेचा पाया असल्याने प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनीही आपापल्या कार्यकर्त्यांमार्फत मतदार याद्यांची पडताळणी करून पात्र मतदारांचे नाव वगळले जाणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. नवीन मतदारांची नोंदणी, पत्ता बदल आणि मतदारसंघनिहाय बदल याचा आगामी राजकीय गणितांवर परिणाम होऊ शकतो.
हेल्प डेस्क व ऑनलाइन सुविधा
विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावर मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच ECINET Appच्या माध्यमातून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ‘Book a Call with BLO’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासावे. नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता अथवा अन्य तपशिलात त्रुटी असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

