Farmers left helpless: शेती करणे दिवसेंदिवस शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे ठरत असून, अवेळी व अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गत एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे. मशागत, पेरणी व इतर बाबींवर खर्च करूनही पिकाचे नुकसान झाल्याने हतबल झालेल्या मिर्झापूर येथील एका शेतकऱ्याने चक्क उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाऊस दडी मारताच सोयाबीनचे स्वप्न कोमेजले; मिर्झापूरच्या शेतकऱ्याचा हतबल निर्णय
बोरगाव मंजू : शेती करणे दिवसेंदिवस शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे ठरत असून, अवेळी व अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गत एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे. मशागत, पेरणी व इतर बाबींवर खर्च करूनही पिकाचे नुकसान झाल्याने हतबल झालेल्या मिर्झापूर येथील एका शेतकऱ्याने चक्क उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिर्झापूर शेतशिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर राऊत यांच्याकडे एक एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी आपल्या शेतात तूर व सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीला पीक बऱ्यापैकी आले होते. मात्र, गेल्या एक महिन्यापासून पावसाने खंड दिल्याने सोयाबीन पीक करपू लागले. फुलांची मोठ्या प्रमाणात गळ झाली असून, अपेक्षित शेंगा न लागल्याने उत्पादनाची आशा मावळली आहे.
पिकासाठी मशागत, पेरणी, बियाणे व इतर खर्च करूनही उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याने शेतकरी ज्ञानेश्वर राऊत हतबल झाले. अखेर त्यांनी आपल्या एक एकरातील सोयाबीनच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केले.
सततच्या हवामानातील बदलांमुळे आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता निसर्गाच्या लहरीपणाचाही मोठा फटका सहन करावा लागत आहे.
शेतकरी म्हणतात…
“माझ्याकडे एक एकर शेती आहे. यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, गेल्या एक महिन्यापासून पाऊस नसल्याने सोयाबीनची फुले गळून पडली. अपेक्षित शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे उत्पादनाची आशा संपुष्टात आली. पिकावर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने अखेर एका एकरातील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला.”
— ज्ञानेश्वर राऊत, शेतकरी, मिर्झापूर

