sprinkler nozzles: साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. पांगरी काटे येथे दि. ३० ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी सात शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलर संचाच्या सुमारे १०० तोट्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

शेतातील गोठ्यांची कुलपे तोडून चोरट्यांचा डल्ला; ७ शेतकऱ्यांचे नुकसान
साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. पांगरी काटे येथे दि. ३० ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी सात शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलर संचाच्या सुमारे १०० तोट्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
पावसाने दडी मारल्याने पांगरी काटे परिसरातील शेतकरी उपलब्ध पाणीसाठ्यावर आपल्या पिकांना जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्प्रिंकलरच्या साहाय्याने पिकांना पाणी देत असतानाच चोरीची घटना घडल्याने संबंधित शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
या चोरीत बाळकृष्ण एकनाथ काटे, नारायण तुकाराम गवई, मदन लक्ष्मण गवई, सतीश अशोक जाधव आणि भास्कर निवृत्ती काटे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलरच्या तोट्या चोरीला गेल्या आहेत. रविवारी सकाळी शेतकरी शेतात गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरट्यांनी नारायण गवई व बाळकृष्ण काटे यांच्या शेतातील गोठ्यांचे कुलूप तोडून स्प्रिंकलरच्या तोट्या लंपास केल्या. तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पाइपलाइनवर बसविलेल्या तोट्या काढून चोरट्यांनी पोबारा केला.
या चोरीत सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची तक्रार साखरखेर्डा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, चोरीच्या वाढत्या घटनांचा तातडीने बंदोबस्त करून चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पावसाअभावी आधीच शेती संकटात असताना सिंचनासाठी आवश्यक असलेल्या स्प्रिंकलर साहित्याची चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

