Paan shop broken : येथील सिकंदर टी पॉईंटलगत असलेल्या उस्मान पान सेंटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल व रोकड लंपास केल्याची घटना २९ ऑगस्टच्या रात्री ते ३० ऑगस्टच्या पहाटेदरम्यान घडली. या प्रकरणी पान सेंटरचे मालक उस्मान शाह बाबा शाह यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कुलूप तोडून चोरट्यांचा डल्ला; अत्तर, पान साहित्य आणि २० हजारांची रोकड चोरीला
बोरगाव मंजू : येथील सिकंदर टी पॉईंटलगत असलेल्या उस्मान पान सेंटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल व रोकड लंपास केल्याची घटना २९ ऑगस्टच्या रात्री ते ३० ऑगस्टच्या पहाटेदरम्यान घडली. या प्रकरणी पान सेंटरचे मालक उस्मान शाह बाबा शाह यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, उस्मान शाह यांचे सिकंदर टी पॉईंटला लागून ‘उस्मान पान सेंटर’ नावाचे दुकान आहे. २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घर गाठले. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ५ वाजता त्यांचे वडील बाबा शाह नदिम शाह हे पान सेंटर उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या उजव्या बाजूच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसले. शटर उघडे असल्याने त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.
याबाबत त्यांनी तत्काळ उस्मान शाह यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. उस्मान शाह घटनास्थळी पोहोचल्यानंतर दुकानातील सुमारे २५ हजार रुपये किमतीचे अत्तराचे बॉक्स, तसेच खाण्याचे पान, सुपारी, लवंग, वेलची आणि सिगारेटच्या पाकिटांसह इतर साहित्य असा सुमारे १५ हजार रुपयांचा माल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याशिवाय, ईदनिमित्त उस्मान शाह आणि मोहसिन शाह युनूस शाह यांनी मागील आठ दिवसांपासून कापड विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायातून झालेल्या विक्रीची २० हजार रुपयांची रोख रक्कम पान सेंटरमध्ये ठेवण्यात आली होती. ही रोकडही चोरट्यांनी लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरीला गेल्याचा अंदाज असून, अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुकानाचे कुलूप तोडून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करून चोरीला गेलेल्या साहित्याचा व रोख रकमेचा शोध घ्यावा तसेच संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी उस्मान शाह यांनी पोलिसांकडे केली आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

