Pavitra’ portal : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी राबविण्यात येत असलेल्या पवित्र प्रणालीअंतर्गत ‘मुलाखतीशिवाय’ निवडप्रकारातील गुणवत्ता यादी गुरुवारी (दि. २७) सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत एकूण १९ हजार ७५४ रिक्त पदांपैकी १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो शिक्षक उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

१९ हजार ७५४ जागा, १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस; पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीचा निकाल जाहीर
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी राबविण्यात येत असलेल्या पवित्र प्रणालीअंतर्गत ‘मुलाखतीशिवाय’ निवडप्रकारातील गुणवत्ता यादी गुरुवारी (दि. २७) सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत एकूण १९ हजार ७५४ रिक्त पदांपैकी १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो शिक्षक उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५चे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. ही चाचणी २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली. परीक्षेसाठी राज्यभरातून २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले, तर १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण केली.
दरम्यान, १ मे ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारच्या पदांच्या जाहिराती प्राप्त झाल्या. पात्र उमेदवारांकडून ६ ते १६ ऑगस्टदरम्यान प्राधान्यक्रम घेण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय निवडप्रकाराची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
व्यवस्थापननिहाय पाहता, जिल्हा परिषदांच्या १३ हजार २२५ पदांपैकी ८ हजार ४८१, नगरपालिकांच्या व नगरपरिषदांच्या २८० पैकी २२६, महानगरपालिकांच्या १ हजार ९५४ पैकी १ हजार ३०६, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील २ हजार ४२१ पैकी १ हजार ६०१, शासकीय विद्यानिकेतनमधील ५६ पैकी ५४, तर खासगी शैक्षणिक संस्थांमधील १ हजार ८१८ पैकी १ हजार ४५१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
पदनिहाय विचार करता, इयत्ता पहिली ते पाचवीच्या १२ हजार ६७१ रिक्त पदांपैकी ७ हजार ५४१, सहावी ते आठवीच्या ५ हजार ४२१ पैकी ४ हजार २०७, नववी ते दहावीच्या १ हजार २९८ पैकी १ हजार ११९, तर अकरावी ते बारावीच्या ३६४ पैकी २५२ पदांसाठी उमेदवारांची शिफारस झाली आहे.
समांतर आरक्षणातील माजी सैनिकांसाठी १५ टक्के आणि अंशकालीन उमेदवारांसाठी १० टक्के पदे मंजूर होती. मात्र, संबंधित प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने अनुक्रमे २ हजार ७६० आणि १ हजार ७६० पदे रिक्त राहिली आहेत. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८०२ आणि पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील १ हजार ४०८ पदेही रिक्त राहिली आहेत. उपलब्ध उमेदवारांच्या अभावामुळे ही पदे ‘कन्व्हर्टेड राउंड’द्वारे भरण्यात येणार आहेत.
निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांना त्यांच्या निवडीबाबत एसएमएसद्वारेही माहिती देण्यात येत आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टलवरील आपल्या लॉगिनमध्ये निवडीची सद्यस्थिती पाहता येणार आहे. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होमपेजवरील ‘Download’ या मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडप्रक्रियेबाबत काही हरकती, तक्रारी किंवा दुरुस्तीच्या बाबी असल्यास राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ‘तक्रार निवारण व दुरुस्ती समिती’कडे आपले म्हणणे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित तक्रारी ६ सप्टेंबर २०२६ अखेर edupavitra2025grcce@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

