Social message : हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अर्थात ईद-ए-मिलादुन्नबीचे औचित्य साधून मलकापूर पांग्रा येथे सरकार सैलानी ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा सामाजिक संदेश दिला.

रक्तदानातून मानवसेवेचा संदेश; सरकार सैलानी ग्रुपच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अर्थात ईद-ए-मिलादुन्नबीचे औचित्य साधून मलकापूर पांग्रा येथे सरकार सैलानी ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा सामाजिक संदेश दिला.
हजरत फकीर शाह बाबा (र.ह.) यांच्या दर्ग्यासमोर बुधवार, २६ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यासाठी जालना ब्लड सेंटर अँड कंपोनंट अॅाफेरेसिस सेंटरच्या वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले होते. शिबिराला नागरिकांसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रक्तदान करण्यापूर्वी वैद्यकीय पथकाने प्रत्येक रक्तदात्याची प्राथमिक आरोग्य तपासणी केली. रक्तदात्यांचे वय, रक्तदाब, हिमोग्लोबिन तसेच आरोग्यविषयक आवश्यक माहिती तपासल्यानंतर पात्र रक्तदात्यांकडून रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी रक्तदानाचे महत्त्व, नियमित रक्तदानाचे फायदे तसेच रक्तदानाबाबत असलेल्या गैरसमजांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणाईची वाढती भूमिका अधोरेखित झाली.
दरम्यान, सरकार सैलानी ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक उपक्रम राबवून सर्वधर्मीय ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. रक्तदान शिबिर आणि महाप्रसादामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी संत साबीर बावा साहेब, समाजसेवक शंकरराव उगलमुगले, बीट जमादार निवृत्ती पोफळे आणि ग्रामविकास अधिकारी परमेश्वर दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी हरून मिस्तरी, तालीम शेख सर यांच्यासह आयोजक व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आरिफ मलिक व फकीरा पठाण यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आयोजकांच्या वतीने रक्तदाते, वैद्यकीय पथक, स्वयंसेवक तसेच सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानण्यात आले.
गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सरकार सैलानी ग्रुपच्या वतीने मागील चार वर्षांपासून ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

