senior citizens: जमाअत-ए-इस्लामी हिंद, अकोला (पश्चिम विभाग) यांच्या वतीने मानवसेवेच्या उद्देशाने स्थानिक वृद्धाश्रमात मोफत वैद्यकीय शिबिर आणि भोजनसेवेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमातील सुमारे ४० ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्यासाठी विशेष दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

ज्येष्ठांच्या सेवेसाठी पुढाकार; वृद्धाश्रमात मोफत वैद्यकीय शिबिर व भोजन वाटप
अकोला : जमाअत-ए-इस्लामी हिंद, अकोला (पश्चिम विभाग) यांच्या वतीने मानवसेवेच्या उद्देशाने स्थानिक वृद्धाश्रमात मोफत वैद्यकीय शिबिर आणि भोजनसेवेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमातील सुमारे ४० ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्यासाठी विशेष दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या सेवा उपक्रमात संस्थेचे पश्चिम विभागातील सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. ज्येष्ठ नागरिकांची सेवा ही सामाजिक व मानवी जबाबदारी मानून कार्यकर्त्यांनी विविध व्यवस्थांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
वैद्यकीय शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासण्यात आला. याशिवाय आवश्यक आरोग्य तपासण्या करून त्यांना वैद्यकीय सल्लाही देण्यात आला. डॉ. हुजैफा खान आणि डॉ. मोहम्मद आसिम यांनी या शिबिरात वैद्यकीय सेवा दिली.
आरोग्य तपासणीनंतर सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली. भोजनामध्ये मिश्र भाजी, भात, पोळी आणि मिठाईचा समावेश होता. जमाअतच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवून त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या गरजा व अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी उपस्थितांनी सांगितले की, इस्लाममध्ये आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व सेवा यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहची उपासना करण्याबरोबरच आई-वडिलांशी उत्तम वर्तन करण्याचा विशेष आदेश देण्यात आला आहे.
वृद्धाश्रमातील परिस्थिती पाहता समाजातील अनेक युवक आजही आई-वडिलांची सेवा व काळजी घेणे हे आपले कर्तव्य मानतात. मात्र, काही ज्येष्ठ नागरिक निराधार किंवा उपेक्षित अवस्थेत वृद्धाश्रमात जीवन जगत आहेत. काही वेळा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मुलांकडूनही आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडले जाते. ही परिस्थिती प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला आई-वडिलांप्रती असलेल्या जबाबदारी व कर्तव्याचा गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडते.
हा वृद्धाश्रम महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री. गुलाबराव गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली चालविण्यात येत आहे.
‘सक्रिय कार्यकर्ता – सक्रिय जमाअत’ या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सुमारे १६ कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी पश्चिम विभागाचे सदस्य, शहराध्यक्ष डॉ. अहमद उरूज तसेच उत्तर विभागाचे सदस्य उपस्थित होते.

