Mahabreaking

[breaking_news]

Democracy Day: तालुकास्तरीय लोकशाही दिन बंदच? नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी नियमित आयोजनाची मागणी

Democracy Day: तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे प्रशासनाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी तातडीने निराकरण व्हावे, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर लोकशाही दिनाचे नियमित आयोजन करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज झ्यंबक इंगळे व रामेश्वर नामदेव झोरे यांनी केली आहे.

Democracy

नागरिकांच्या समस्या ऐकणार कोण? देऊळगाव राजात लोकशाही दिन नियमित घेण्याची मागणी

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे प्रशासनाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी तातडीने निराकरण व्हावे, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर लोकशाही दिनाचे नियमित आयोजन करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज झ्यंबक इंगळे व रामेश्वर नामदेव झोरे यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा तसेच तहसीलदार, देऊळगाव राजा व सिंदखेडराजा यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे नियमित आयोजन होत नसल्याने नागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी व विविध प्रशासकीय प्रश्न मांडण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

लोकशाही दिनाच्या आयोजनाबाबत नाराजी

शासनाच्या निर्देशानुसार लोकशाही दिनाचे आयोजन करणे अपेक्षित असतानाही देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तहसील कार्यालयाच्या स्तरावर त्याचे नियमित आयोजन होत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. लोकशाही दिनाच्या आयोजनाबाबत कार्यालयामार्फत वृत्तपत्रे किंवा अन्य माध्यमांतून आवश्यक सूचना प्रसिद्ध केली जात नसल्याने नागरिकांमध्येही याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्याचे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे.

लोकशाही दिनाच्या दिवशी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणे आवश्यक आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अर्ज व तक्रारींवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मात्र अधिकारी उपस्थित राहत नसल्याने तसेच संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या जात नसल्यामुळे नागरिकांच्या समस्या प्रलंबित राहत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

दर तीन आठवड्यांनी आयोजनाची मागणी

या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करून शासनाच्या नियमानुसार दर तीन आठवड्यांनी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे नियमित आयोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच लोकशाही दिनासाठी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात आणि नागरिकांना लोकशाही दिनाच्या आयोजनाची माहिती वेळोवेळी उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लोकशाही दिनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रशासनाने या उपक्रमाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तालुकास्तरीय लोकशाही दिन नियमित सुरू करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top