Soybean crop : निकृष्ट दर्जाचे बियाणे, पावसातील अनियमितता, पावसाचा खंड, वाढता उत्पादन खर्च आणि पिकांवरील रोगराई अशा विविध संकटांमुळे बोरगाव मंजू परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत असून, ऐन फुलोऱ्यात असलेल्या पिकाची पाने पिवळी पडून फुले व कळ्या गळत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

फुलोऱ्यातील सोयाबीनची फुले गळू लागल्याने उत्पादन घटण्याची शक्यता; बोरगाव मंजू परिसरातील शेतकरी धास्तावले
बोरगाव मंजू : निकृष्ट दर्जाचे बियाणे, पावसातील अनियमितता, पावसाचा खंड, वाढता उत्पादन खर्च आणि पिकांवरील रोगराई अशा विविध संकटांमुळे बोरगाव मंजू परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत असून, ऐन फुलोऱ्यात असलेल्या पिकाची पाने पिवळी पडून फुले व कळ्या गळत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, वाशिंबा, पळसो बढे, काटेपूर्णा, कानशिवणी, सागळुद, दहीगाव, वणी रंभापूर आदी परिसरातील सोयाबीनसह अन्य खरीप पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचा खंड आणि त्यानंतर उघडीप यामुळे पिकांची परिस्थिती बिकट होत चालली आहे.
फुलोऱ्यातील पिकाला पावसाची प्रतीक्षा
यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद आदी खरीप पिकांची पेरणी केली आहे. सोयाबीन पीक सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना पानांवर पिवळेपणा दिसून येत आहे. तसेच कळ्या आणि फुले गळून पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकाला आवश्यक वेळी पाऊस न मिळाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
“यंदा सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. सोयाबीन ऐन फुलोऱ्यात असताना पिकावर पिवळेपणा आला असून फुलोरा गळत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.”
— गजानन देशमुख, शेतकरी, बोरगाव मंजू
कृषी विभागाने पाहणी करण्याची गरज
सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक’चा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येत असून, याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
“सोयाबीन पिकावर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा केला जाईल.”
— जयकृष्ण ठोकळ, माजी अध्यक्ष, तालुका कृषी आत्मा समिती
उत्पादन घटण्याची भीती
फुलोऱ्यातील सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कळ्या आणि फुले गळून पडत आहेत. परिणामी उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या हातात येणारे उत्पादन कमी झाल्यास त्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
“बोरगाव मंजू शिवारात यलो मोझॅकमुळे सोयाबीनची पाने पिवळी पडली आहेत. फुलोऱ्यातील पिके रोगाच्या प्रादुर्भावाने बाधित होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.”
— सुबोध गवई, सामाजिक कार्यकर्ते
निसर्गाच्या भरवशावर शेती
परिसरातील बहुतांश शेती काळी आणि बरड अशा दोन प्रकारच्या जमिनीत विभागलेली आहे. बरड जमिनीवरील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांना पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसत आहे. दुसरीकडे वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रवही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.उभ्या पिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर शेतीची देखभाल केल्यानंतर रात्रीही शेतात रखवाली करावी लागत आहे. त्यामुळे पिकांवरील रोगराई, पावसाचा खंड, उत्पादन खर्च आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव अशा अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

