Minor schoolgirl: बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव येथे खासगी शिकवणीवरून घरी जात असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी २३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

शिकवणीवरून घरी जाताना विद्यार्थिनीचा पाठलाग; वाडेगावात विनयभंगाची घटना
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव येथे खासगी शिकवणीवरून घरी जात असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी २३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी खासगी शिकवणी वर्ग आटोपून घरी जात होती. त्यावेळी आरोपीने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. वाडेगावातील जुन्या ग्रामपंचायतीजवळील मागील गल्ली परिसरात आरोपीने विद्यार्थिनीचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घडलेला प्रकार विद्यार्थिनीने घरी सांगितल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी तिला सोबत घेऊन बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यातील कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद खाडे करीत आहेत.

