Mosquito outbreak: वातावरणातील बदलासोबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे बीबी गावातील अनेक भागांत पाणी साचले आहे. नाल्या तुंबल्याने तसेच स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध आजारांचे रुग्ण वाढत असून, ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्येही गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

साचलेले पाणी अन् तुंबलेल्या नाल्यांचा फटका; बीबीतील दवाखाने रुग्णांनी भरले
रमेश खंडागळे
बीबी : वातावरणातील बदलासोबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे बीबी गावातील अनेक भागांत पाणी साचले आहे. नाल्या तुंबल्याने तसेच स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध आजारांचे रुग्ण वाढत असून, ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्येही गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
बीबी गावातील अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये तसेच रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून आहे. काही ठिकाणी कचरा आणि घाणीचे साम्राज्य असल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी लहान बालके, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, डोकेदुखी तसेच इतर आजारांचा त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
डासांचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिल्यास डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. बीबी ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्या सुमारे २०० पर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत असून, खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
नाल्यांची स्वच्छता करून फॉगिंगची मागणी
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने नाल्यांची साफसफाई करावी. तसेच गावातील डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी फॉगिंग मशीनद्वारे धूरफवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्यापूर्वी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

