Santosh Khade : आगामी कावड यात्रा आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर गावात शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी सजग राहावे. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये आणि अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी केले.

साखरखेर्ड्यात शांतता समितीचा निर्धार; सण-उत्सवात सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन
साखरखेर्डा : आगामी कावड यात्रा आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर गावात शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी सजग राहावे. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये आणि अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी केले.
साखरखेर्डा येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना संतोष खाडे म्हणाले की, २४ ऑगस्ट रोजी कावड यात्रा, तर २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादचा उत्सव साजरा होणार आहे. दोन्ही उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.
कावड यात्रा साखरखेर्डा शहरातून ठरलेल्या मार्गानेच काढण्यात यावी. यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह वक्तव्ये करू नयेत तसेच वाद निर्माण करणारी किंवा आक्षेपार्ह गाणी वाजवू नयेत. कोणी अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न करीत असल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. संबंधितांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे खाडे यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक समाजातील नागरिकांनी सण-उत्सव साजरे करताना एकमेकांना सहकार्य करून सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
साखरखेर्डा गावाने नेहमीच शांतता आणि सामाजिक सलोखा जपला आहे. यापुढेही कावड यात्रा आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही उत्सव शांततेत पार पडतील, असा विश्वास व्यक्त करत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी माजी सैनिक अर्जुन गवई, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे आणि अस्लम अंजूम यांनीही आपले विचार मांडले.
बैठकीला ठाणेदार युवराज रबडे, माजी सरपंच कमलाकर गवई, भाजपचे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे, सुनील जगताप, गोपाल राजपूत, शुभम राजपूत, रामदाससिंग राजपूत, दिलीप बेंडमाळी, संदीप खिल्लारे, इब्राहिम शहा, माजी सरपंच दाऊद कुरेशी, अन्नसार कुरेशी, असलम शहा, आयुब कुरेशी यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

