Mahabreaking

[breaking_news]

water scarcity : सिंदखेडराजातील ९५ गावांवर पाणीटंचाईचे सावट; आराखड्याची तत्काळ अंमलबजावणी करा – संजय खडसे

water scarcity : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा तालुक्यातील ९५ गावांमध्ये आगामी काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाई आराखड्याची प्रत्येक गावात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज असून, संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिले.

water

  नोव्हेंबरपासून पाणीटंचाईची शक्यता; एसडीओ संजय खडसेंची गावोगावी तलाव-विहिरींची पाहणी

अशोक इंगळे

सिंदखेडराजा : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा तालुक्यातील ९५ गावांमध्ये आगामी काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाई आराखड्याची प्रत्येक गावात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज असून, संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिले.

३ ऑक्टोबर रोजी संजय खडसे यांनी साखरखेर्डा व शेंदुर्जन मंडळातील विविध गावांमधील तलाव, विहिरी आणि उपलब्ध पाणीसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी सवडद, मोहाडी, शिंदी, राताळी, पिंपळगाव सोनारा, तांदुळवाडी, शेंदुर्जन, बाळसमुद्र, सायाळा, लिंगा, पांग्रीकाटे, गोरेगाव, गुंज, सावंगी भगत आणि साखरखेर्डा या भागांतील पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. ग्राम महसूल अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून गावनिहाय माहिती घेऊन संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

साखरखेर्ड्यासाठी शेवगाव जहागीर विहिरीची पाहणी

साखरखेर्डा गावाची लोकसंख्या लक्षात घेता नियमित पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी स्रोत उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीने संजय खडसे यांनी कोराडी धरण क्षेत्रातील शेवगाव जहागीर येथील विहिरीची पाहणी केली. या विहिरीतून साखरखेर्डा गावाला नियमित पाणीपुरवठा कसा करता येईल, याबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

सध्या कोराडी प्रकल्पावरून मोहाडी, सवडद, गुंज, वरोडी आणि साखरखेर्डा या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तर महालक्ष्मी तलावातून सावंगी भगत आणि गायखेडी तलावातून शिंदी व राताळी या गावांना पाणीपुरवठा केला जातो.

काही गावांना टँकरची गरज भासण्याची शक्यता

पिंपळगाव सोनारा आणि तांदुळवाडी या गावांसाठी आगामी काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. तसेच गायखेडी तलावात केवळ मृतसाठा शिल्लक असल्याने राताळी आणि शिंदी या गावांनाही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

राजेगाव तलावातील पाणी राखीव ठेवण्याची गरज

राजेगाव तलावातून शेंदुर्जन, बाळसमुद्र, सायाळा, लिंगा, गोरेगाव, पांग्रीकाटे, कंडारी, भंडारी, जागदरी आणि राजेगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीसाठा राखीव ठेवण्याची गरज असल्याचे संजय खडसे यांनी सांगितले. यासाठी लवकरच नियोजन करण्यात येणार असून, पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी अवैध पाणी उपसा बंद करण्याच्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.

हिवरागडलिंग, हनवतखेड तलाव ७५ टक्के भरले

हिवरागडलिंग आणि हनवतखेड सिंचन तलाव सध्या सुमारे ७५ टक्के भरलेले आहेत. या तलावांमधून हनवतखेड, हिवरागडलिंग, वाघाळा, मलकापूर पांग्रा, पोफळ शिवणी, जनुना तांडा आणि आंबेवाडी या गावांना पाणीपुरवठा केला जातो. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन केल्यास आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यास मदत होणार आहे.

ग्रामपंचायत व महसूल यंत्रणेवर जबाबदारी

नोव्हेंबरपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने आतापासूनच गावनिहाय पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. दुष्काळाच्या काळात पाणीपुरवठा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तत्काळ नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांची राहणार असल्याचे संजय खडसे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कोराडी धरणाला प्रथमच भेट देण्याचा योग आल्याचे सांगताना संजय खडसे यांनी स्वामी विवेकानंद स्मारकाचे दूरून दर्शन झाल्याचे नमूद केले. हे स्मारक अप्रतिम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रवीण वऱ्हाडे, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे, संजय शिंगणे, लखन राजपूत, शिवानंद वाकदकर, गिऱ्हे यांच्यासह दोन्ही मंडळांतील ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top