suicide by hanging : म्हैसागजवळील T-पॉईंट परिसरातील मोटार गॅरेजमध्ये ५४ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. सतिष रामदास गवई (वय ५४, रा. घुगसी) असे मृतकाचे नाव आहे.

गॅरेजमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
बोरगाव मंजू : म्हैसागजवळील T-पॉईंट परिसरातील मोटार गॅरेजमध्ये ५४ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. सतिष रामदास गवई (वय ५४, रा. घुगसी) असे मृतकाचे नाव आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, T-पॉईंटजवळील एका मोटार गॅरेजमध्ये इसम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल प्रमोद डोईफोडे, किशोर सोळंके, शुभम फलके आणि संजय सैतवाल यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
मृतदेह अकोला येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील माहिती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

