Mahabreaking

[breaking_news]

heavy rainfall :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २३.३३ कोटींची मदत; बुलढाण्याच्या वाट्याला सर्वाधिक १०.७८ कोटी

heavy rainfall : जून आणि जुलै २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी बुलढाणा जिल्ह्यासाठी तब्बल १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील ७ हजार ६५८ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४८९.९१ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीसाठी ही मदत मिळणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

heavy

बुलढाण्यातील ७,६५८ शेतकऱ्यांना १० कोटी ७८ लाखांचा दिलासा; मदत थेट खात्यात

बुलढाणा  : जून आणि जुलै २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी बुलढाणा जिल्ह्यासाठी तब्बल १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील ७ हजार ६५८ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४८९.९१ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीसाठी ही मदत मिळणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आधार मिळावा, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यासाठी मंजूर झालेल्या एकूण निधीपैकी मोठा हिस्सा बुलढाणा जिल्ह्याला मिळाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील नुकसानीने अडचणीत आलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मदत व पुनर्वसन विभागाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला. राज्यातील ११ हजार २०७.७९ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीसाठी १७ हजार २४५ शेतकऱ्यांना एकूण २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

यामध्ये अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांतील ९ हजार ६८३ बाधित शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी बुलढाणा जिल्ह्याला १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपये मिळणार आहेत. पुणे विभागातील पुणे व सातारा जिल्ह्यांतील ६ हजार ५६५ शेतकऱ्यांसाठी ९ कोटी १३ लाख २२ हजार रुपये, नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ६६१ शेतकऱ्यांसाठी ३८ लाख ८७ हजार रुपये, तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ बाधित शेतकऱ्यांसाठी ४१ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मदत थेट खात्यात

बाधित शेतकऱ्यांना मंजूर झालेली मदत डीबीटी प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही मदत शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाच्या परतफेडीसाठी किंवा वसुलीसाठी वळती करून घेऊ नये, अशा सूचना सर्व बँकांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मदत वाटप करताना एकाच नुकसानीसाठी एकाच शेतकऱ्याला दुबार लाभ मिळणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी त्याच हंगामात त्याच क्षेत्रासाठी मदत मिळालेल्या लाभार्थ्यांना पुन्हा मदत देताना द्विरुक्ती होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे.

मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची यादी आणि वितरित मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

शेतकऱ्यांना आर्थिक आधार

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर ७ हजार ६५८ शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरणार आहे.

“नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मंजूर झालेला निधी शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी निश्चितच आधार देईल,” असे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top