Case registered against three : पातुरातील जुने बसस्थानक येथे तिघांनी संगनमत करून एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना आज पहाटे दीड वाजताच्या सुमारास घडली.

दिग्रस बु : पातुरातील जुने बसस्थानक येथे तिघांनी संगनमत करून एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना आज पहाटे दीड वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पातुर शहरातील जुने बसस्थानक परिसरात रात्रीच्या सुमारास अक्षय उमाळे आणि त्यांचे जावई शंकर पाटील हे मुलाची तब्येत बरी नसल्याने स्टँडवरील हॉटेलमध्ये बिस्कीट घेण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शिवम उर्फ शिवा निलखन आणि योगेश तायडे हे दोघे तेथे आले. त्यांनी अक्षय उमाळे यांच्या गाडीची चावी काढून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
या प्रकारात शंकर पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना देखील ढकलण्यात आले. शंकर पाटील यांनी तत्काळ हाकेच्या अंतरावर असलेल्या पातूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, शिवा निलखन याने मोबाईलवरून आपल्या साथीदाराला बोलावले. त्यानंतर तिघांनी मिळून अक्षय उमाळे यांचे अपहरण करून त्यांना शहरातील नानासाहेब वेटाळ यांच्या घराजवळ नेऊन जबर मारहाण केली.मारहाणी दरम्यान आरोपींनी “पोलिसात तक्रार केलीस तर तुझे जगणे अवघड करू” अशी धमकी दिली. त्यांनी लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. त्याचवेळी शंकर पाटील पोलिसांसोबत घटनास्थळी पोहोचले असता, शिवा निलखन याने पोलिसांनाही धमकी देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पातूर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.
फिर्यादी अक्षय उमाळे यांच्या तक्रारीवरून शिवा निलखन, आकाश राऊत आणि योगेश तायडे या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार हणमंत डोपवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रमेश खंडारे करीत आहेत.

