Soybean harvesting : तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकाच्या काढणीच्या हंगामात निसर्गाचा मोठा फटका बसला आहे. सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिक पाण्याखाली गेले असून, उताऱ्यात घट, मजुरी दरवाढ आणि भावात घसरण या तिहेरी संकटांनी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना तिहेरी फटका; बियाण्यांना फुटले कोंब, विमा व शासन मदतीचा पत्ताच नाही
बाळापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकाच्या काढणीच्या हंगामात निसर्गाचा मोठा फटका बसला आहे. सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिक पाण्याखाली गेले असून, उताऱ्यात घट, मजुरी दरवाढ आणि भावात घसरण या तिहेरी संकटांनी शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मागील महिनाभर बाळापूर तालुक्यात सतत पाऊस झाल्याने अनेक शेतात पाणी साचले. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. पाण्यामुळे बियाण्यांना कोंब फुटल्याने त्याच्या प्रती क्विंटल भावातही घसरण झाली आहे. स्थानिक बाजार समितीनुसार, अशा ‘डागील’ सोयाबीनला सध्या साडेतीन हजार ते तीन हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना काढणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले असून, मजुरीचे दर गेल्या वर्षाच्या तुलनेत ५०० ते ८०० रुपये प्रति एकरने वाढले आहेत. गेल्या वर्षी एकरी दोन ते तीन हजार रुपयांत काढणी होत होती, तर यंदा तीन हजार ८०० ते चार हजार २०० रुपये इतका दर आकारला जात आहे. त्यामुळे मजुरीचाच मोठा भार शेतकऱ्यांवर आला आहे.
शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत किंवा कृषी विमा नुकसानभरपाई अद्याप न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकाचे नुकसान, कमी झालेला उतारा, भावात घसरण आणि वाढती मजुरी — या सगळ्यांनी शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे.
“हाती आलेलं सोयाबीन पिक पाण्याखाली गेलं. बियाणं डागील झालं, उताऱ्यात घट झाली आणि भावही पडले. चारही बाजूंनी फटका बसला आहे.”
— महेश चव्हाण, शेतकरी, कवठा“मुसळधार पावसामुळे आमचं पीक डागील झालं. सध्या बाजारात फक्त साडेतीन हजार रुपयांचा दर मिळतोय, तर एकरी काढणीचा खर्च चार हजारांच्या घरात गेला आहे.”
— विलास खोडके, शेतकरी, बाळापूर

