lockdown : लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या वादातून शिवभक्त महिलेला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने २१ फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा शहर बंदची हाक देण्यात आली. या आवाहनाला व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. आठवडी बाजारही पूर्णपणे बंद राहिल्याने शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या वादातून शिवभक्त महिलेला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने २१ फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा शहर बंदची हाक देण्यात आली. या आवाहनाला व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. आठवडी बाजारही पूर्णपणे बंद राहिल्याने शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
२० फेब्रुवारी रोजी रात्री लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात शिवाजी महाराजांचा पुतळा हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. याला विरोध करण्यासाठी शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर वाद वाढत सरपंच व त्यांच्या समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली.
घटनेचे पडसाद देऊळगाव राजा शहरात उमटले. सकल मराठा समाजाने शहर बंदचे आवाहन केले. सकाळी आंदोलनकर्त्यांनी बसस्थानक चौकात टायर जाळून निषेध व्यक्त केला. दरम्यान आठवडी बाजारासाठी भाजीपाल्याची आवक झाली होती; मात्र अचानक बंदच्या आवाहनामुळे व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. काही ठिकाणी आंदोलनकर्ते व व्यापाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाले; पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

लोकप्रतिनिधींचे आवाहन
विभागाचे आमदार मनोज कायंदे यांनी सोशल मीडियावरून शांततेचे आवाहन केले. माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनीही आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन केले.

कडक पोलीस बंदोबस्त
पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. विविध मार्गांवरून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. उपनिरीक्षक नितीन मिंड, राजकुमार कांबळे, ढाकणे यांच्यासह बुलढाणा येथील पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. एकूणच, घटनेच्या निषेधार्थ देऊळगाव राजा शहर पूर्णपणे बंद राहिले असून वातावरण तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी बुलढाणा या पेजला भेट द्या

