Woman attempts : पातुर तालुक्यातील अतिदुर्गम सावरगाव येथे मंजुळा जानकीराम डाखोरे या महिलेने रस्ता न मिळाल्यामुळे अखेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र चान्नी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचवण्यात आला.

सावरगाव येथील धक्कादायक घटना
दिग्रस बू : पातुर तालुक्यातील अतिदुर्गम सावरगाव येथे मंजुळा जानकीराम डाखोरे या महिलेने रस्ता न मिळाल्यामुळे अखेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र चान्नी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचवण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, महिलेच्या घरासमोरील एका व्यक्तीने घरकुलाचे बांधकाम केल्याने तिच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. या संदर्भात डाखोरे यांनी ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
या निष्क्रियतेविरोधात डाखोरे यांनी दोन वेळा आमरण उपोषण केले होते — पहिल्यांदा २१ ते २२ जुलै, तर दुसऱ्यांदा १५ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत एकूण १४ दिवस. तत्कालीन गटविकास अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी रस्ता मोकळा करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. परंतु दोन महिने उलटूनही रस्ता मोकळा करण्यात आला नाही.
यानंतर संतप्त झालेल्या महिलेने चान्नी पोलीस व प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा देणारे स्मरणपत्र दिले होते. अखेर १३ नोव्हेंबर रोजी सावरगाव ग्रामपंचायत परिसरात तिने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र ठाणेदार रवींद्र लांडे यांनी आधीच घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तिचे प्राण वाचवले.
या प्रकरणी ठाणेदार लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उज्वला इटीवाले, सौंदर्या बेसरकार, गीते महादेव देशमुख, उमेश सांगळे आदींनी महिलेवर कारवाई करून तिच्याविरुद्ध आत्मदहनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
“माझ्या मृत्यूला जबाबदार प्रशासनच!” — महिलेचा इशारा
मंजुळा डाखोरे यांनी रस्ता मिळवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष केला. तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने त्यांनी आत्मदहनाचा मार्ग पत्करला. आपल्या स्मरणपत्रात त्यांनी नमूद केले आहे की, “जर माझा मृत्यू झाला, तर खोटे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडणारे तत्कालीन अधिकारी व पदाधिकारीच जबाबदार राहतील.”

