Wild boar plague: कोला वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या वाडेगाव परिसरात रानडुकरांचा हैदोस वाढत असून नुकत्याच पेरलेल्या हरभरा पिकाचे बियाणे फस्त झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

राहुल सोनोने
वाडेगाव : अकोला वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या वाडेगाव परिसरात रानडुकरांचा हैदोस वाढत असून नुकत्याच पेरलेल्या हरभरा पिकाचे बियाणे फस्त झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगाव येथील शेतकरी शरदचंद्र वासुदेवराव फाळके यांनी सर्वे क्र. २०५७ मधील शेतात हरभऱ्याची पेरणी केली होती. पेरणीनंतर तीन दिवसांनी उगवण तपासण्यासाठी ते शेतात गेले असता, एकही रोप न उगवता संपूर्ण बियाणे रानडुकरांनी उखडून खाल्ल्याचे दिसून आले. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.या पिकासाठी सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी रानडुकरांचे थवे शेतात येऊन फस्त करत असल्याने शेतकरी रात्रंदिवस जागरण करत आहेत, तरीही नुकसान होतच आहे.शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तात्काळ पंचनामा करून आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे. रानडुकरांच्या वाढत्या संख्येमुळे या भागातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फाळके यांनी सांगितले की, “माझ्या शेतात चार एकर क्षेत्रात हरभरा पेरणी केली होती. रानडुकरांच्या झुंडीने बियाणे पूर्ण फस्त केल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे. वनविभागाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी.”
या संदर्भात शिवसेना युवा नेते निवृत्ती म्हैसने यांनी सांगितले की, “या परिसरात रानडुकरांचा प्रचंड हैदोस झाला आहे. अकोला वन विभागाने तातडीने कारवाई करून या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना निर्धास्तपणे शेती करता येईल आणि त्यांचे जीवन सुरक्षित राहील.”

