Water Released :रेतीच्या उत्खननासाठी चक्क कोल्हापूरी बंधाऱ्याचे पाणी सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साठवलेले पाणी सोडल्याने या परिसरात आता उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. तसेच रब्बी हंगामासाठीही पाणी मिळणार नसल्याने परिसरातील ग्रामस्थांसह शेतकरी आक्रमक झाले आहेत. या ग्रामस्थांनी थेट किनगाव राजा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे.

दुसरबीड परिसरात उन्हाळयात बसणार पाणीटंचाईचे चटके, रब्बी पिकेही संकटात
दुसरबीड: रेतीच्या उत्खननासाठी चक्क कोल्हापूरी बंधाऱ्याचे पाणी सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साठवलेले पाणी सोडल्याने या परिसरात आता उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. तसेच रब्बी हंगामासाठीही पाणी मिळणार नसल्याने परिसरातील ग्रामस्थांसह शेतकरी आक्रमक झाले आहेत. या ग्रामस्थांनी थेट किनगाव राजा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे.
लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्याहस्ते हवालदार मोरे यांचा पदकाने गौरव,सवडद ग्रामस्थांनी केला सत्कार
मेहकर लघु पाटबंधारे विभागांतर्गत खडकपूर्णा नदीवरील दुसरबीड येथील कोल्हापूर बंधारा बांधण्यात आला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ साठी लोखंडी प्लेटच्या साहाय्याने हा बंधारा बंद करण्यात आला होता. या बंधाऱ्यात अडविण्यात आलेले पाणी परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठी तसेच अनेक शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी उपयोगात येणार होते.
नदीकाठच्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना कोरड्या पडल्याने नागरिकांसह जनावरांसाठीही पाण्याचा थेंब शिल्लक राहिला नव्हता. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे आणि ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी खडकपूर्णा नदीवरील नाथसागर धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार देऊळगाव मही ते वझर आघाव या दरम्यान नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आणि मार्गातील विविध बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा करण्यात आला होता. मात्र याच नदीपात्रात शासनमान्य दुसरबीड रेती घाट कार्यरत असून सध्या नदीत पाणी साचलेले असतानाही पोकलेन मशीनच्या साहाय्याने रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाण्यामुळे उत्खननात अडथळा येत असल्याने रेती घाट चालकाने रात्रीच्या वेळी दुसरबीड कोल्हापूर बंधाऱ्यातील पाणी नदीपात्रात सोडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत बंधाऱ्यातील मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले होते. घटनास्थळी लोखंडी जाड सळ्या, लाकडी ओंडके, वायरचे जाड दोर आढळून आल्याने हा प्रकार जाणूनबुजून केल्याचा संशय अधिक बळावला आहे.
कठोर कारवाईची केली मागणी
या प्रकारामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला असून शेतकरी आणि ग्रामस्थांनी किंगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रेती उत्खननासाठी पाणी सोडल्याचा आरोप खरा ठरल्यास संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रशासनाच्या उद्देशालाच फासली हरताळ
दुसरबीडसह परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नाथसागर प्रकल्पातून पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश दिले होते. नदीकाठावरील गावांना पाणी मिळावे, या उदात्त हेतुने जिल्हा प्रशासनाने पाणी सोडले.मात्र, या बंधाऱ्यातील पाणी सोडल्याने प्रशासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.

