voter lists inconclusive : लोणार नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नुकत्याच शहरातील प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि घोळ झाल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काही ठिकाणी एका मतदाराचे नाव दोन ते तीन प्रभागांमध्ये आढळून आले आहे, तर काही ठिकाणी खऱ्या मतदारांची नावे वगळून चुकीची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे इच्छुक उमेदवारांसह नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

लोणार : लोणार नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नुकत्याच शहरातील प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि घोळ झाल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काही ठिकाणी एका मतदाराचे नाव दोन ते तीन प्रभागांमध्ये आढळून आले आहे, तर काही ठिकाणी खऱ्या मतदारांची नावे वगळून चुकीची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे इच्छुक उमेदवारांसह नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाने मतदार याद्या तयार करताना आवश्यक ती पडताळणी न केल्यामुळे अनेक ठिकाणी घर क्रमांक, पत्ते आणि वडिलांची नावे चुकीची नोंदवली गेली आहेत. काही कुटुंबांचे संपूर्ण सदस्य याद्यांतून गायब झाले आहेत, तर काही मृत व्यक्तींची नावे अद्याप कायम आहेत. दुसरीकडे, नवीन नोंदणी केलेल्या युवकांची नावे याद्यांमध्ये समाविष्टच नाहीत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे लेखी आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली असून, याद्यांतील प्रत्येक नोंदीची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करूनच अंतिम यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश मापारी यांनी सांगितले की, “फक्त संगणकाच्या आधारे याद्या तयार करून जाहीर करणे हा लोकशाही प्रक्रियेचा अपमान आहे. प्रत्येक प्रभागातील अधिकारी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून मतदारांची खात्री करावी.”
स्थानिक सामाजिक संघटनांनीदेखील मतदार याद्यांतील या घोळावर प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांच्या मते, “मतदार यादी ही निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची कडी आहे. जर तीच चुकीची असेल, तर मतदान प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.”अनेक प्रभागांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे विभक्त प्रभागांमध्ये, तर काही ठिकाणी एकच नाव दोन यादींत दिसत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नागरिकांचा ठाम आग्रह आहे की, जबाबदार कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी आणि अचूक यादी पुन्हा तयार करावी.
दरम्यान, नगरपालिका प्रशासनाने या घोळाची कबुली देत, ही तांत्रिक त्रुटी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, “चुकीच्या नोंदींबाबत नागरिकांनी आक्षेप नोंदवावेत. त्यानंतर पुनर्पडताळणी करून अचूक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.” मात्र, नागरिकांचे म्हणणे आहे की प्रशासन वारंवार “तांत्रिक त्रुटी” हे कारण देऊन स्वतःची जबाबदारी झटकते, आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो.एकूणच, प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांतील गंभीर त्रुटींमुळे लोणार नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी आता ठाम भूमिका घेत, प्रत्यक्ष स्थळ निरीक्षणानंतरच अंतिम मतदार यादी तयार करण्याची मागणी केली असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

