demand installation of CCTV : येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

देऊळगाव मही : येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुष क्रांतीचे दर्शन: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनुभवली शेगावमधील भव्य आरोग्य प्रदर्शनी
सदर स्मारक हे गावाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक महत्त्वाचे केंद्र असून येथे नियमितपणे ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. विविध जयंती, पुण्यतिथी आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक येथे एकत्र येतात. त्यामुळे स्मारक परिसराची सुरक्षितता आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणांची देखभाल व सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असल्याचेही ग्रामस्थांनी अधोरेखित केले आहे.
भविष्यात कोणतीही अनुचित घटना किंवा असामाजिक कृत्य घडू नये, तसेच एखादी घटना घडल्यास त्याचा पुरावा उपलब्ध राहावा, यासाठी स्मारकासमोर आणि परिसरात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. सीसीटीव्ही यंत्रणा बसविल्यास सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण होईल, कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल आणि संभाव्य गुन्हेगारी कृत्यांवर आळा बसण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामपंचायतीने या मागणीचा तातडीने सकारात्मक विचार करून आवश्यक प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर विजय शिंगणे, देवा पाटील, सुरेश शेळके, राम शिंगणे, अभिषेक शिंगणे, दीपक शिंगणे, बळीराम शिंगणे, किशोर शिंगणे, निशांत देशमुख यांच्यासह असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

