municipal elections : जिल्ह्यातील ११ नगरपालिका निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. हा निकाल संमिश्र स्वरूपाचा ठरला आहे. बुलढाणा, खामगाव व चिखली येथे अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. जिल्ह्यातील ११ नगराध्यक्ष पदांपैकी चार ठिकाणी भाजप, तीन ठिकाणी काँग्रेस, तर उद्धव सेना, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना प्रत्येकी एका ठिकाणी विजय मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना धक्का; खामगाव, चिखलीत भाजप, तर बुलढाण्यात शिंदे सेनेचा नगराध्यक्ष
बुलढाणा : जिल्ह्यातील ११ नगरपालिका निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. हा निकाल संमिश्र स्वरूपाचा ठरला आहे. बुलढाणा, खामगाव व चिखली येथे अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. जिल्ह्यातील ११ नगराध्यक्ष पदांपैकी चार ठिकाणी भाजप, तीन ठिकाणी काँग्रेस, तर उद्धव सेना, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना प्रत्येकी एका ठिकाणी विजय मिळाला आहे.
बुलढाणा शहरात नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत झाली. या लढतीत शिंदे सेनेच्या पूजाताई गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या लक्ष्मी काकस यांच्यात मुख्य लढत होती. आमदार संजय गायकवाड यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पूजाताई गायकवाड यांनी लक्ष्मी काकस यांचा पराभव करत विजय मिळवला. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
खामगावमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अर्पणा फुंडकर यांनी एकतर्फी विजय मिळवला. चिखली येथे आमदार श्वेता महाले यांनी आपला गड राखण्यात यश मिळवले असून भाजपचे पंडितराव देशमुख विजयी झाले आहेत.
देऊळगाव राजा येथे युवा आमदार मनोज कायंदे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे व शिंदे सेनेचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आघाडी करून मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, आमदार मनोज कायंदे यांनी या दोन्ही दिग्गज नेत्यांना पुरून उरत बाजी मारली. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या माधुरीताई शिपणे विजयी झाल्या.
सिंदखेड राजा नगरपालिका निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती होती. मात्र, येथे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे समर्थक सौरभ तायडे विजयी झाले.मेहकर मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना मोठा धक्का बसला असून, मेहकरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उद्धव सेनेचे किशोर गारोळे विजयी झाले आहेत. लोणार येथे काँग्रेसच्या मीरा मापारी यांनी विजय मिळवला आहे.दोन्ही पालिकांवर विजय मिळवण्यात शिंदे सेनेला अपयश आले आहे.
मलकापूरमध्ये भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांनाही धक्का बसला असून, मलकापूर नगरपालिकेत काँग्रेसचे अतिकूर रहमान शफि कूररहमान विजयी झाले आहेत. जळगाव जामोद येथे आमदार डॉ. संजय कुटे यांनी गड राखला असून, भाजपचे गणेश दांडगे विजयी झाले आहेत. शेगाव येथे काँग्रेसचे प्रकाश शेगोकार, तर नांदुरा नगरपालिकेत भाजपच्या मंगलाताई मुऱ्हेकर विजयी झाल्या आहेत.

