Prataprao Jadhav: केंद्र व राज्य शासनाचा आरोग्य विभाग आणि स्टेट बँक फाउंडेशनच्या वतीने गत तीन महिन्यांपासून नागरिकांच्या १४ प्रकारच्या मोफत आरोग्य चाचण्या घेण्याचे अभियान सुरू असून त्यासाठी जीवनम सुरक्षा अंतर्गत ग्रामीण भागात आरोग्य तपासणी अभियानाच्या प्रचारासाठी आरोग्य सुरक्षारथाचे आज केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

जीवनम सुरक्षा अंतर्गत हाेणार आरोग्य तपासणी
मेहकर : केंद्र व राज्य शासनाचा आरोग्य विभाग आणि स्टेट बँक फाउंडेशनच्या वतीने गत तीन महिन्यांपासून नागरिकांच्या १४ प्रकारच्या मोफत आरोग्य चाचण्या घेण्याचे अभियान सुरू असून त्यासाठी जीवनम सुरक्षा अंतर्गत ग्रामीण भागात आरोग्य तपासणी अभियानाच्या प्रचारासाठी आरोग्य सुरक्षारथाचे आज केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
शिवसेना कार्यालयात आज यानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. नेत्र तपासणी, कॅन्सर,हृदयरोग विषयक तपासणी आणि महिलांच्या संबंधी अनेक प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. जीवनम सुरक्षा अभियानांतर्गत मेहकर, लोणार तालुक्यात १४ प्रकारच्या मोफत आरोग्य तपासण्या करून निदान व उपचाराची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याची व्याप्ती जिल्हाभर वाढवण्यात येणार आहे.
अभियानाच्या प्रचार प्रसारासाठी विशेष आरोग्य रथ तयार करण्यात आला असून त्याचे लोकार्पण ना.जाधव यांच्या हस्ते आज करण्यात आले. माजी आमदार संजय रायमुलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात माहिती देताना प्रतापराव जाधव म्हणाले की, मेहकर तालुक्यात दहा हजार नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. ३१२ अस्थमाचे रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. ३ हजारावर नागरिकांची नेत्र तपासणी पूर्ण करून त्यांना चष्मे प्रदान करण्यात आले आहेत. ३२ जणांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले असून त्यांच्या मोफत उपचाराची व्यवस्था वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात करण्यात आली आहे.
सर्व नागरिकांनी या अभियानांतर्गत त्यांच्या गावामध्ये अभियानातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या व तंत्रज्ञांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करून घ्यावी. एखाद्या दुर्धर रोगाची व्याप्ती वाढण्याआधीच निदान करून मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, शहरप्रमुख जयचंद बाठीया, दिलीपबापू देशमुख ,योगेश जाधव ,नीरज रायमुलकर, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे, डॉ. धैर्यशील रहाटे , संतोष अवस्थी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

