Three killed : राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैलपाडा नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना दिवाळीच्या रात्री सुमारे दहाच्या सुमारास घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू शहरात शोककळा पसरली आहे.अपघाताची माहिती मिळताच बाेरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील पैलपाडा नजीकची घटना; बोरगावात शोककळा
संजय तायडे
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैलपाडा नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना दिवाळीच्या रात्री सुमारे दहाच्या सुमारास घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू शहरात शोककळा पसरली आहे.अपघाताची माहिती मिळताच बाेरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू येथील धीरज शाळीग्राम सिरसाठ (वय ३५) आणि त्यांची पत्नी अश्विनी धीरज सिरसाठ (वय ३०) हे दोघे छोटा हत्ती (क्र. MH-30 AB-2006) या वाहनाने मानकी (ता. कारंजा) येथे जात होते. दरम्यान, पैलपाडा परिसरात त्यांच्या वाहनात अचानक बिघाड झाल्याने त्यांनी परतीचा प्रवास करण्याचे ठरविले. त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे आपल्या परिचितांना संपर्क करून नादुरुस्त वाहन बोरगाव मंजू येथे टोचनने आणण्यासाठी बोलावले. आरिफ खा अहमद खा (वय २८) आणि अन्वर खा अब्दुल खा (वय २५) हे दोघे टोचनसाठी त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी सिरसाठ दांपत्य आणि त्यांचे सहकारी हे टाटा वाहनात बसण्यासाठी तयारी करत असतानाच, मुर्तिजापूरकडून बोरगाव मंजूकडे येणाऱ्या एका भरधाव अज्ञात मालवाहू वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात धीरज सिरसाठ, अश्विनी सिरसाठ आणि आरिफ खा यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्वर खा हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस निरीक्षक अनिल गोपाळ, कर्मचारी वीर भगतसिंग पथकाचे योगेश विजयकर आणि सामाजिक कार्यकर्ते सुयोग देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमीस तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहांचा पंचनामा करून त्यांना उत्तरीय तपासणीसाठी मुर्तिजापूर शासकीय रुग्णालयात पाठविले. शाळीग्राम सिरसाठ यांनी या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
रस्ता अपघाताने हिरावला कुटुंबाचा आधार; चिमुकल्यांचे छत्र हरपले
पैलपाडा नजीक झालेल्या भीषण रस्ता अपघातात बोरगाव मंजू येथील पती-पत्नी धीरज सिरसाठ आणि अश्विनी सिरसाठ यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने केवळ एक नव्हे, तर दोन निष्पाप चिमुकल्यांचे मायेचे छत्र हरपले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. धीरज आणि अश्विनी सिरसाठ हे दोघेही अत्यंत मनमिळाऊ व समाजप्रिय स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील आणि दोन लहान मुले — एक मुलगा व एक मुलगी — असे एक आनंदी कुटुंब होते. धीरज हे कुटुंबाचे प्रमुख असून त्यांनी स्वतःच्या कष्टाने व्यवसाय उभारला होता. त्यांच्या पाठीशी पत्नी अश्विनी खांद्याला खांदा लावून उभी होती.
मात्र, या अपघाताने त्यांच्या संसाराचा गाडा अर्ध्यावर थांबला. कुटुंबाचा आधार असलेले धीरज आणि त्यांच्या साथीदार अश्विनी दोघांनीही या दुर्घटनेत प्राण गमावले. त्यामुळे दोन्ही चिमुकल्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ते पोरके झाले आहेत. धीरज यांना मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्यांपैकी एकाचा देखील अपघातात मृत्यू झाल्याने समाजमन अधिकच व्यथित झाले आहे. दिवाळीच्या आनंदाचा सण शोकात परिवर्तित झाला असून संपूर्ण बोरगाव मंजू शहरात शोककळा पसरली आहे.

