The Shri Sopinath Maharaj : पातूर तालुक्यातील पंचक्रोशीत श्रद्धेचे केंद्र असलेल्या ग्राम दिग्रस बु. येथे श्री सोपीनाथ महाराज यात्रा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा यात्रा महोत्सव सोमवार, दिनांक २ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरू होणार असून मुख्य यात्रा दिवस शुक्रवार, ६ फेब्रुवारी व शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे.

राहुल सोनोने
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील पंचक्रोशीत श्रद्धेचे केंद्र असलेल्या ग्राम दिग्रस बु. येथे श्री सोपीनाथ महाराज यात्रा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा यात्रा महोत्सव सोमवार, दिनांक २ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरू होणार असून मुख्य यात्रा दिवस शुक्रवार, ६ फेब्रुवारी व शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे.
सोमवार, २ फेब्रुवारी रोजी देवाच्या लग्नाचा सोहळा संपन्न होणार असून त्यानिमित्त सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या मुख्य दिवसांमध्ये संपूर्ण जिल्ह्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त राहुट्या टाकून आठ दिवस मुक्कामी वास्तव्य करीत श्री सोपीनाथ महाराजांचे दर्शन घेतात.
यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने दररोज रात्री ८.३० वाजता कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ह.भ.प. संतोष पाटील महाराज (चांगलवाडी), ह.भ.प. गोपाळ महाराज (उरळ), ह.भ.प. शुभम महाराज आखरे (खिरपुरी), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (केकन), ह.भ.प. गजानन महाराज गायकवाड, ह.भ.प. नंदू महाराज इंगळे (चांदुर), ह.भ.प. रामकृष्ण महाराज कचाले आदी नामवंत कीर्तनकार सेवा देणार असून पंचक्रोशीतील सर्व टाळकरी मंडळांचीही विशेष सेवा राहणार आहे.
यात्रेचा मुख्य उत्सव शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत होणार असून या निमित्ताने हलवाई दुकाने, हॉटेल, खानावळ, पालपडवे, आकाशपाळणे, भजन-दिंड्या, चित्रपटगृहे आदी व्यावसायिकांनी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक ती दक्षता व व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. तसेच खुल्या भजन मंडळांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
धार्मिक यात्रेचे पावित्र्य कायम राखण्यासाठी वादी, रिंग गुडगुडी, तमाशा, लोकनाट्य, मच्छीचा खेळ तसेच नशापाणी, जुगार यांसारखे गैरप्रकार पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आले असून आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येणार आहे. यात्रेच्या नियोजनासाठी राम ताले, अनंता गावंडे, दत्तात्रय ग. ताले, विठ्ठल म. ताले, बाजीराव ताले, रविंद्र गवई, अनिल ताले आदी विशेष सहकार्य करीत आहेत.
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री सोपीनाथ महाराज यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजय ताले, पंच कमिटी व श्री सोपीनाथ महाराज संस्थान, दिग्रस बु. यांच्या वतीने करण्यात आले आहे.

